दुरवस्थेमुळे जळका-मोझरी मार्गावर रुग्णांसह नागरिकांचे हाल!
प्रशांत कांबळे यांनी विधानसभा उपाध्यक्षांकडे नादुरुस्त रस्त्याची केली तक्रार
तिवसा WH NEWS : जळका येथील पौराणिक खंडोबा मंदिर ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोझरी येथील समाधीस्थळापर्यंत जाणाऱ्या मुख्य ‘दिंडी मार्गा’ची गेल्या १५ वर्षांपासून अत्यंत दुरवस्था झाली आहे. हा मार्ग केवळ खड्डेमय झाला नसून, यामुळे गंभीर रुग्णांना आणि प्रवाशांना मृत्यूच्या यातना सहन कराव्या लागत असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात तातडीने रस्ता नूतनीकरण आणि रुंदीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना निवेदन देऊन तक्रार केली आहे.

या मागणीसाठी ९ ते १२ मार्च या कालावधीत माणिकग्राम धोत्रा येथे आमरण उपोषणही करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाकडून कोणताही ठोस तोडगा निघाला नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रकाश चिचखेडे, अमोल वावरे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे निवेदन देऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. त्यावरून विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांनी यासंदर्भात विधीमंडळ सभागृहात तातडीने बैठक करण्याच्या सूचना दिल्या आहे.
प्रमुख समस्या आणि मागण्या
– गेल्या १२ ते १५ वर्षांपासून या मार्गावर केवळ तात्पुरते खड्डे बुजवण्याचे काम केले जात आहे. ठोस दुरुस्ती किंवा रुंदीकरण न झाल्यामुळे रस्ता ‘जसा आहे तसाच’ निकृष्ट अवस्थेत आहे.
– या मार्गावर हृदयविकार, कॅन्सर आणि गर्भवती महिलांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, रस्त्यात असलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अमरावती येथील ‘अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल’मध्ये पोहोचताना रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
– अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात किंवा वाहतूक कोंडी झाल्यास जळका ते मोझरी हा मार्ग जड वाहनांसाठी महत्त्वाचा पर्यायी मार्ग मानला जातो. असे असूनही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
– दरवर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त या मार्गावरून सुमारे १०० हून अधिक दिंड्यांचा पायी प्रवास असतो. वारकऱ्यांनाही या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे.
