अजितदादांच्या राष्ट्रवादीत अंतर्गत वाद तीव्र? पत्रप्रकरणावरून पटेल-तटकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह,?पुढील घडामोडींवर लक्ष!
मुंबई | WH NEWS प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत घडामोडींना वेग आला असून, पक्षाच्या घटनेत बदल करण्यासंदर्भातील पत्रव्यवहारामुळे नव्या वादाला तोंड फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
16 फेब्रुवारी 2026 रोजी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या सह्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या पत्रात कार्याध्यक्षपदाला अधिक अधिकार देण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या प्रस्तावानुसार काही अधिकार कार्याध्यक्षांकडे सोपवण्याचा विचार असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, 10 मार्च रोजी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून संबंधित पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, अशी विनंती केल्याचे समजते. या घडामोडीनंतर पक्षांतर्गत चर्चांना उधाण आले असून, काही स्तरावर मतभेद असल्याचीही चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या पार्श्वभूमीवर वांद्रे येथील एमईटी संस्थेत काही वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ उपस्थित होते. बैठकीत निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करून संबंधित मुद्द्यांवर स्पष्टीकरण देण्याची गरज व्यक्त करण्यात आल्याचे सांगितले जाते.
यानंतर संबंधित नेत्यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. मात्र, या स्पष्टीकरणाबाबत सुनेत्रा पवार समाधान व्यक्त करत असल्याचे स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
पुढील घडामोडींवर लक्ष
सदर प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत मतभेद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील काळात या वादाचे राजकीय परिणाम काय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
