🇵🇷🇪🇸🇸
🇳🇴🇹🇪
“कहीं हम भूल न जायें” अभियानाद्वारे महाराष्ट्रातील राज्यव्यापी “आंबेडकर मेळा ऑन व्हील्स” चा पहिला टप्पा यशस्वीरीत्या संपन्न.
नागपूर WH NEWS – बाबासाहेब डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्रातील संपूर्ण छत्तीसही जिल्ह्यांमध्ये आंबेडकरवादी चळवळीप्रती जनजागृती निर्माण करण्याकरिता दोन महिन्याच्या कालावधीत सात टप्प्यांमध्ये “चालत्या फिरत्या आंबेडकर मेळ्याचे” (“आंबेडकर मेळा ऑन व्हील्स” चे) भव्य राज्यव्यापी आयोजन सुरू आहे. मान्यवर कांशीरामजी यांच्या जयंती पासून म्हणजे १५ मार्च २०२६ पासून मेळ्याची सुरुवात झाली आहे.

“आंबेडकर मेळा ऑन व्हील्स” चा पहिला टप्पा दिनांक १५ मार्च ला सुरू होऊन २४ मार्च २०२६ पर्यंत चालला. या पहिल्या टप्प्यादरम्यान अमरावती, अकोला, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर, छत्रपती संभाजी नगर व जालना ह्या १५ जिल्ह्यांमध्ये २६११ किलोमीटरचा प्रवास करीत आंबेडकरवादी चळवळीचा प्रचार आणि प्रसार केल्या गेला. चौका-चौकांमध्ये थांबून ४३ नुक्कड सभा व वस्त्यांमध्ये ७ जाहीर सभा घेण्यात आल्या. अशाप्रकारे एकूण ५० सभा घेण्यात आल्या. यानंतर २७ मार्च ते ३० मार्च २०२६ या कालावधीत होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याची तयारी जोमाने सुरू आहे. “चालत्या फिरत्या आंबेडकर मेळ्याचे” समापन १७ मे २०२६ ला दीक्षाभूमी, नागपूर येथे आठव्या बहुजन परिषदेच्या माध्यमातून होणार आहे.

या मेळ्यामध्ये विद्यार्थी, महिला, पुरुष व कर्मचारी या सर्वांचा समावेश दिसत आहे. “आंबेडकर मेळा ऑन व्हील्स च्या या राज्यव्यापी कार्याला महाराष्ट्रातील जनतेने सहकार्य करावे तथा आंबेडकरवादी चळवळ गतिमान करण्यासाठी भीमजयंतीपुरते मर्यादित न राहता राज्यातील जनतेने आयुष्यभरासाठी बाबासाहेबांना अपेक्षित चळवळीसाठीचा कृती कार्यक्रम गांभीर्याने हाती घ्यावा” असे कळकळीचे आवाहन “कहीं हम भूल न जायें” अभियानाचे ॲड. अतुल पाटील यांनी केले आहे.
