ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांच्या निधनाने विदर्भाच्या विकासाचा आधारवड हरपला – डॉ. नितीन राऊत
नागपूर (२२ मार्च) :WH NEWS
राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने विदर्भाने आपला एक खंबीर आधारवड आणि मार्गदर्शक गमावला आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार डॉ. नितीन राऊत यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.
दत्ताजी मेघे यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना डॉ. राऊत म्हणाले की, दत्ताजींचे जाणे ही केवळ राजकीय क्षेत्राची नव्हे, तर माझी वैयक्तिक हानी आहे. त्यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात केलेले कार्य हे येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखे राहील. वर्धा आणि नागपूर जिल्ह्याच्या विकासात त्यांचे योगदान विसरता येणार नाही. राजकारणात सक्रिय असतानाही त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध जोपासले होते.
शिक्षण आणि आरोग्याचा ध्यास
डॉ. राऊत यांनी पुढे नमूद केले की, दत्ताजींनी केवळ संस्था उभ्या केल्या नाहीत, तर त्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या हातात शिक्षणाची पाटी दिली. आरोग्य सुविधा सामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचे मोठे काम त्यांनी आयुष्यभर केले. तसेच, दत्ताजी मेघे यांनी आपल्या कार्यातून केवळ विकासकामेच केली नाहीत, तर अनेक कार्यकर्ते, नेते आणि समाजासाठी झटणारी माणसे घडविली, ही त्यांची मोठी देणगी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली ही पिढीच आज त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत आहे.
पुढे ते म्हणाले, त्यांनी आपल्या कार्यातून अनेकांना दिशा दिली. समाजातील वंचित घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. मी दत्ताजी मेघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मेघे परिवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर ओढवलेल्या या कठीण प्रसंगी मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो अश्या शब्दात डॉ. राऊत यांनी दिवंगत दत्ता मेघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
