आमचे गाव 30 वर्षा पासून दारूमुक्त… मग सरकार काय देते?
अमरावती जिल्ह्यातील आदर्श उपक्रमावर एक विशेष लेख..!
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे पंचायत समिती अंतर्गत येणारे गट ग्रामपंचायत पाथरगाव – थुगांव हे आज संपूर्ण परिसरासाठी आदर्श ठरत आहेत. कारण या गावांनी केवळ घोषणाच नाही तर प्रत्यक्ष कृतीतून गेल्या सुमारे ३० वर्षांपासून दारूमुक्त गावाचा संकल्प जपला आहे.त्यामुळे गावात वादविवाद सुद्धा नाही. पोलिसात तक्रारी सुद्धा नाही.
गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला बचत गट, युवक मंडळे आणि ग्रामपंचायत यांच्या सामूहिक निर्णयामुळे गावात दारू विक्री, सेवन आणि अवैध दारूचा व्यापार पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. गावातील लोकांनी स्वतःच सामाजिक नियम बनवून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली. त्यामुळे गावात भांडणे, कौटुंबिक हिंसा, गुन्हेगारी आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.
स्थानिकांच्या मते, दारूमुक्तीमुळे गावात शांतता, सामाजिक ऐक्य आणि विकासाचे वातावरण निर्माण झाले. शेतकरी आपल्या कामात अधिक लक्ष देऊ लागले, तर युवक शिक्षण आणि रोजगाराकडे वळले. महिलांनीही बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला.
मात्र या सकारात्मक बदलांमध्ये एक मोठा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करतात —
“आमचे गाव दारूमुक्त आहे… मग सरकार आम्हाला काय देते?”
राज्य सरकारकडून दारूमुक्त गावांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना किंवा विशेष निधी देण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, जे गाव समाजहितासाठी स्वतःहून असा मोठा निर्णय घेतात, त्यांना विकासासाठी विशेष अनुदान, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते किंवा शैक्षणिक सुविधा देऊन प्रोत्साहन दिले पाहिजे.
ग्रामस्थांच्या मते, जर सरकारने अशा गावांना प्रोत्साहन दिले तर इतर गावांनाही प्रेरणा मिळेल आणि दारूमुक्त गावांची संख्या वाढण्यास मदत होईल.
पाथरगाव,थुगांव या गावांनी दाखवून दिले आहे की, सामूहिक इच्छाशक्ती असेल तर कोणताही सामाजिक बदल शक्य आहे. गेल्या तीन दशकांपासून दारूमुक्तीचा आदर्श जपत ही गावे आज संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.
मात्र आता गावकऱ्यांची एकच अपेक्षा आहे —
“समाजासाठी केलेल्या या निर्णयाची दखल सरकारने घ्यावी आणि दारूमुक्त गावांना विशेष प्रोत्साहन द्यावे.”
विजय खवसे, पत्रकार नागपूर 7972935260
