वामनराव मोतीरामजी गोडबोले यांच्या १९ व्या स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन .

0
2

वामनराव मोतीरामजी गोडबोले यांच्या १९ व्या स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन .
वामनराव गोडबोले यांचा जन्म १ जानेवारी १९२२ रोजी नागपूर येथे महारपुऱ्यात (सध्याच्या आनंद टाॅकीज-समोरची वस्ती) झाला. वडिलांचे नाव मोतीरामजी आणि आईचे नाव कस्तुरीबाई होते. त्या दाम्पत्याला पाच मुले आणि तीन मुली (यशोदा, किसन, बळीराम, सुभद्रा, गोविंद, कौसल्य, वामन आणि प्रेमचंद). वामनरावांच्या पूर्वजांचे खरे आडनाव गोरले असे होते. परंतु शाळेत गुरूजींनी मोठ्या भावाचे नाव गोरले ऐवजी गोडबोले टाकले आणि त्यानुसार सर्व भावंडांचे आडनाव गोडबोले होत गेले. त्यांचे वडील मोतीरामजी नागपूरच्या आजूबाजूच्या खेड्यांत भरणाऱ्या आठवडी बाजारात बैलगाडीवरून धोतरजोडी विकण्याचा व्यवसाय करीत. आई मिलमध्ये कामाला जात असे. घरच्या ओसरीत लहानसे किराणा दुकान ही होते. वामनराव शालेय शिक्षण घेत असतानाच, १९३५ साली त्यांच्या वडिलांचे दम्याच्या आजाराने निधन झाले. त्याअगोदर वामनरावांचे थोरले दोन भाऊ किसन रेल्वेत, गार्ड (ग्रेड-१) म्हणून तर गोविंद फायरमन (ग्रेड-१) नोकरीला लागलेले होते.

वामनरावांना बालपणापासून समाजकार्याची ओढ आणि आवड होती. वामनराव मॅट्रिक पास झाल्यानंतर, ते थोरला भाऊ, किसनच्या प्रयत्नाने रेल्वेतच मालगाडीचा गार्ड म्हणून नोकरीला लागले. ३७ वर्षे रेल्वेत सेवा करून, ते सुपरफास्ट एक्सप्रेसचे ग्रेड-१ गार्ड म्हणून सेवानिवृत्त झाले.
निवृत्तीनंतर त्यांनी धम्मप्रचारक प्रशिक्षण विद्यालय सुरू केले. गोपिकाबाई ठाकरे या महिलेने त्यासाठी चिंचोली येथे अकरा एकर जमीन दान म्हणून दिली. गोडबोले यांनी तिथेच आपला प्रकल्प स्थापून त्याला ‘शांतिवन’ असे नाव दिले. त्यांनी शांतिवनात बाबासाहेबांच्या दुर्मिळ वस्तू संकलित करून त्याचे एक दुमजली संग्रहालय स्थापन केले आहे. तसेच एक प्रशस्त बुद्ध विहारही बांधले आहे. बौद्ध धर्मावर अभ्यास करणाऱ्या संशोधक-विद्यार्थ्यांसाठी बौद्ध धर्मावरील प्राचीन-अतिप्राचीन संदर्भसाहित्य असलेले प्राच्यविद्या साहित्य-संग्रहालय स्थापन करण्याच्या उद्देशाने त्यांनी एका भव्य इमारतीचे बांधकाम हाती घेतले होते. ते अर्धवट पडून आहे. त्यांचे ३ मे २००६ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी शांतिवनात निधन झाले. गोडबोले हे आयुष्यभर अविवाहित राहिले.
०१ जानेवारी १९२२ – ०३ मे २००६
आठवणीतले बाबासाहेब या पुस्तकातून
संकलन – नवनीत मोटघरे

सभार फेसबुक -नवनीत मोटघरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here