नागपुरात 8 सप्टेंबरला शिवभोजन धरकांचे धरणे आंदोलन
सहा महिन्यांपासून थकीत बिल; महिला बचत गटांमध्ये नाराजी
नागपूर :WH NEWS
शिवभोजन थाळी योजना चालविणाऱ्या केंद्र चालकांना सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेली देयके तात्काळ अदा करण्याच्या मागणीसाठी नागपूर शहर शिवभोजन थाळी केंद्र संचालक संघटनेच्या वतीने 8 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता संविधान चौकात भव्य धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
शिवभोजन योजना 1 जानेवारी 2020 पासून राज्यभर सुरू असून, दररोज सुमारे दोन लाख गरीब, मजूर, महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना अल्प दरात जेवण उपलब्ध करून दिले जाते. मात्र, केंद्र चालकांना सहा महिन्यांपासून बिल मिळालेले नाही. त्यामुळे महिला बचत गटांना कर्ज काढून केंद्र चालवावे लागत आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना वारंवार निवेदन देऊनही तोडगा निघालेला नाही. मंत्रालयाकडे प्रस्ताव प्रलंबित असून अर्थमंत्र्यांकडून मंजुरी न मिळाल्याने बचत गटांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
शहर अध्यक्ष तानाजी वनवे, शहर सचिव डॉ. जानबा मस्के, कोषाध्यक्ष किशोर ठाकरे, ग्रामीण अध्यक्ष राजू पोलकुमवार आणि भास्कर पराते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जर आठ दिवसांत देयके अदा झाली नाहीत, तर हे आंदोलन महाराष्ट्रभर जिल्हा व तालुका स्तरावर उभारले जाईल व शासनाचा निषेध केला जाईल.
Leave a Reply