पंतप्रधान मोदींनी संविधानाचे वाचनच केले नाही
◼️ राहुल गांधी यांचा घनाघात
◾️गोंदियात प्रचारसभा
गोंदियाः– संविधानात समानता दिली आहे. मात्र, नरेंद्र मोदी, आरएसएस व भाजपचे लोक हे २४ तास केवळ संविधानाची हत्या करण्याचा प्रयत्नात असतात. तर हा हल्ला ते समोर न येता बंद दारातून छुप्या पद्धतीने करतात. माझ्याकडे जे संविधानाचे पुस्तक आहे ते लाल रंगाचे आहे. असे मोदी म्हणतात तर या संविधानात फुले, आंबेडकर, भगवान बुद्ध यांचे विचार नाहीत का असा प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान मोदी यांनी संविधानाचे वाचनच केले नाही. त्यांनी ही पुस्तक वाचली असती तर तिचे आदर केले असते. असा घनाघात लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला.
मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी गोंदिया येथील सर्कस मैदानात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रसंगी व्यासपीठावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भंडारा-गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बंसोड, मध्यप्रदेशचे आमदार विक्की पटेल, अनुभा मुंजारे, हिना कावरे, माजी खासदार खुशाल बोपचे, माजी आमदार रमेश कुथे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे, शिवसेना उबाठाचे जिल्हा प्रमुख पंकज यादव, शैलेष जायसवाल आदि उपस्थित होते. पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, संविधानात लिहलं आहे की समानता झाली पाहीजे, यात लिहिले आहे, हिंदुस्थानातील संस्था हिंदुस्थानातील जनतेच्या आहे कुण्या एकाची नाही.
तेव्हा आपला पहिला काम जाती जनगनणना असून दुसरे काम ५० टक्के आरक्षणाची भिंत फोडण्याचा आहे. आजघडीला देशाची आबादी किती व त्यात आरक्षण किती याची खरी जाणीव कुणालाही नाही, दलित १५ टक्के, आदिवासी ८ टक्के असे सांगितले जाते. तर इतर मागासवर्गीय किती आहेत याची खरी आकडेवारी मात्र, कुणाकडे ही नाही. आम्हाला ९० टक्केवाला आरक्षण पाहिजे, ज्यामध्ये शेतकर्यांचा सन्मान व्हावा, मजूरांचा सन्मान असावा यासाठी देशात जातीगणना होने गरजेचे आहे. मात्र, ते करण्यास ही सरकार टाळाटाळ करित आहे. पण मी या सरकारला या लोकसभेची मुदत संपण्यापूर्वी जातीगत जनगणना करण्यास भाग पाडणार असल्याचे ते म्हणाले.
नरेंद्र मोदी नेहमी शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करतात. मात्र, त्यांनी एकही शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही. मोदींनी देशात तीन काळे कृषी कायदे आणले होते. त्या विरोधात संपूर्ण देशातील शेतकरी रस्त्यावर उतरले तरी देखील नरेंद्र मोदी हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगतात. हे कायदे शेतकरी हिताचे असते तर शेतकरी या विरोधात रस्त्यावर कसे हा प्रश्न यामुळे निर्माण होत असल्याचेही राहुल गांधी म्हणाले. ही सरकार अंबानी आणि अदानी ची सरकार असून त्यांचे १६ लाख कोटी रूपयांचे कर्ज या सरकारनी माफ केले आहे. तर एक लाख कोटी रूपयांची धारावी ची जमीन अदानीच्या घश्यात घालवली असल्याचा आरोप करत, महाराष्ट्र राज्यात येवू घातलेले उद्योग हे सरकार गुजरात ला पळविण्याचा पाप सर्रासपणे करत असल्याचा आरोप ही याप्रसंगी राहुल गांधी यांनी केंद्र व राज्य सरकार वर केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की महायुती सरकार दुसऱ्याची घरे फोडून आपली घरे सजवायला निघालेली आहे. आज संपूर्ण राज्यात भ्रष्टाचारानी आपली सीमा ओलांडली आहे.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात ज्यांनी भ्रष्टाचार केलं ते इतर ठिकाणी सोडणार का? असा उपस्थित करत आज संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीची लाट आलेली असून पुढील सरकार ही महाविकास आघाडीची येणार असल्याचे नाना पटोले म्हणाले. यावेळी प्रचारसभेला गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी उपस्थिती लावल्यामुळे गोंदिया शहराला जत्रेचे स्वरुप आले होते.