गोंदिया : देशात आणि राज्यात महागाईने उच्चांक गाठलेला आहे. यात आजघडीला वीस रुपयांचा नोट म्हणजे आर्थिक दृष्ट्या जवळजवळ नगण्य मानला जातो. पण या नगण्य मानल्या जाणाऱ्या २० रुपयांच्या नोटाची चर्चा मात्र, गोंदिया विधानसभा मतदारसंघात विशेषतः ग्रामीण भागात आवर्जून केली जात आहे. तर सोशल मीडियावरही या चर्चांना उधाण आलेला आहे.
लोकसभा, विधानसभा किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती अथवा ग्राम पंचायत निवडणूक असो उमेदवाराकडून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याकरिता किंवा मतदाराला आपल्या बाजूने
वळविण्याकरिता विविध आश्वासने आणि विविध आमिषे मत मिळविण्याकरिता दाखविली जातात. यातही काही उमेदवार विविध प्रकारे नवनवीन क्लुप्त्या अवलंबून आपल्या या कृत्याद्वारे निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घेतात. सद्या अशाच एका प्रकाराने गोंदिया विधानसभेत चर्चांना पेव फुटले आहे. मतदारसंघातील एका मोठ्या पक्षाच्या उमेदवाराने आपल्या समर्थकांमार्फत मतदारांना घरोघरी जाऊन आपल्याला मत मिळावी म्हणून २० रुपयाच्या नोट सध्या टोकन मनी म्हणून दिला असल्याची चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, जिंकून आल्यास या वीस रुपयाच्या नोटच्या मोबदल्यात हजार रुपये देण्याचे आमिष ही या उमेदवाराकडून दाखविण्यात आले असल्याचे समजते. निवडणुकीत “कत्तल ची रात्र” समजल्या जाणाऱ्या मतदानाच्या पूर्वसंध्येला गोंदिया विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण परिसरात हे २० रुपयाचे चे नोट वाटण्यात आलेले आहेत. चर्चेच्याच माध्यमातून यासंदर्भातील माहिती आजच्या मोबाइलचा काळात हळूहळू करत गोंदिया शहरातील मतदारांपर्यंतही पोहोचलेली आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच या २० रुपयाच्या नोट च्या टोकन ची चर्चा गोंदिया शहरात केली जात आहे. गोंदिया विधानसभाकरिता बुधवारी २० नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात गोंदिया विधानसभेत ७१ टक्के मतदारांनी आपल्या मताचा हक्क बजावलेला आहे. दरम्यान, मतमोजणी शनिवार २३ नोव्हेंबर रोजी होणार असल्यामुळे आपण केलेल्या मतदानाची आणि ‘कोण मागे कोण पुढेʼ असणार याबाबतची चर्चा जनतेत आपसूकच होत राहते अशातच यंदा फक्त दोनच दिवस या चर्चेकरिता मिळालेले आहेत. त्यामुळे इतर चर्चा होत असताना गोंदिया विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण परिसरात मतदारांना दिलेल्या त्या २० रुपयांच्या नोट ची आवर्जून चर्चा केली जात आहे. मात्र, जिंकून आल्यानंतर ही सदर उमेदवार या २० रुपयाच्या नोटच्या मोबदल्यात आपण दिलेला शब्द पाडणार की नाही, याबाबत साशंकता असल्यामुळे गोंदिया ग्रामीण परिसरातील मतदार या संदर्भात ही चर्चा करीत आहेत. तर समाजमाध्यमावरही या २० रुपयाच्या नोटची चर्चा जोमात केली जात आहे.
00000