विनोद अग्रवाल यांना ऑटो यूनियनचा पाठिंबा
गोंदिया : गोंदिया विधानसभा मतदारसंघातील शहर व ग्रामीण ऑटो युनियनच्या अनेक पदाधिकारी व ऑटो चालकांनी आमदार तथा महायुतीचे भाजपा उमेदवार विनोद अग्रवाल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला.
आमदार विनोद अग्रवाल यांनी प्रत्येक परिस्थितीत निस्वार्थपणे मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार अग्रवाल यापूर्वीही आमच्यासोबत होते आणि भविष्यातही आमच्यासोबत राहतील. या भागात कमळ फुलवण्यात आपण सर्वजण त्यांच्यासोबत असल्याचे ऑटो युनियनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, ऑटोचालकांकडून मिळालेल्या पाठिंब्यावर महायुतीचे उमेदवार विनोद अग्रवाल म्हणाले, ४० वर्षांच्या राजकीय जीवनात आपण ९० टक्के समाजसेवा आणि १० टक्के राजकारण केला आहे. मानवसेवेच्या माध्यमातून गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचे काम केले. जेव्हा जेव्हा ऑटो चालकांना कोणत्याही अडथळ्याचा सामना करावा लागला. तेव्हा आम्ही प्रत्येक स्तरावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत केली.
चांगले रस्ते बांधून ऑटोवरील दुरुस्ती खर्च कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ऑटो चालकांचे आरोग्य लक्षात घेऊन दरवर्षी वैद्यकीय शिबिरे राबविण्यात येणार आहेत. रिक्षा चालक बांधवांसाठी प्रमुख चौकात ऑटो स्टँड, विश्रांती कक्ष यासह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असून शहर व ग्रामीण भागातील ऑटोचालकांच्या कुटुंबांच्या उन्नतीसाठीही आम्ही काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी ऑटो चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शहर व ग्रामीण भागातील अनेक ऑटो चालक उपस्थित होते.