ना बटेंगे ना कटेंगे, जितकर रहेंगे : गोविंददेव गिरी
◾️ शिवचैतन्य जागरण यात्रा*
गोंदिया : आपला हिंदू धर्म कल्याणाचा उपदेश करतो. भारताच्या मुळात धर्माचा डीएनए आहे. धर्म जीवनात मूल्यवर्धन आहे. आज आपला धर्म विरोधी शक्तींच्या निशाण्यावर आहे. त्यांना तो नष्ट करायचा आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, आधी आपण एकजूट हिंदू आहोत आणि नंतर माळी, कुणबी, ब्राह्मण आणि इतर आहोत. ‘ना बटेंगे ना कटेंगे, जितकर रहेंगे,’ हे लक्षात ठेवा,’ असे प्रतिपादन श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (अयोध्या) चे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांनी केले.
शिवचैतन्य जागरण यात्रेचा एक भाग म्हणून येथील नेहरू चौकात आयोजित सभेत ते बोलत होते. प्रख्यात समाजसेवक सुधीर बजाज सभेच्या अध्यक्षस्थानी होते. संत लहरी आश्रम संस्थान कामठाचे (मध्यकाशी) पीठाधीश डॉ. खिलेश्वरनाथ खरकाटे ऊर्फ तुकड्याबाबा, ब्रह्माकुमारी प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या बी. के. रत्नमाला दीदी, यशेश्वरानंद महाराज, संत सेवकराम टेकाम व्यासपीठावर उपस्थित होते.
गिरी महाराज म्हणाले, देशाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यावर उपायांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अवलंब करा. आपल्या राष्ट्रासाठी तोच एकमेव उपाय आहे. सुमारे ३५० वर्षांपूर्वीच्या सुमारास शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा काही सामान्य प्रसंग नव्हता. संपूर्ण देश अंधारात असताना तो प्रकाशझोत होता. आपण कोणाला शरण जावे आणि कोणाच्या विरोधात उभे राहावे हे जाणून घेणे आवश्यक असल्याचे महाराज म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने गणमान्य नागरिक व मातृशक्ती उपस्थित होते.
…