मद्यपी मुलाने केली जन्मदात्री आईची हत्या
◾️सालेकसा तालुक्यातील कुणबी येथील घटना
◾️ विहिरीत उडी घेऊन स्वतःचेही जीवन संपविले
गोंदिया : दारुच्या आहारी गेलेल्या पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्री वृद्ध आईचा कुर्हाडीने वार करून खून केल्याची व विहिरीत उडी घेत स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कुणबीटोला येथे शुक्रवार (ता. १५) सकाळी ९.३० ते दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. सुलकनबाई बनोठे (वय ७५), लेखराज बनोठे (वय ५४) दोघेही राहणार कुणबीटोला, ता. सालेकसा असे मृत आई व मृत आरोपी मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत आरोपी लेखराज व त्याची वृद्ध आई सुलकनबाई दोघीही एकत्र राहत होते. त्यात लेखराज यास दारूचे व्यसन होते. घटनेच्या वेळी शुक्रवारी, सकाळच्या सुमारास सुलकनबाई या घरात एकट्या असताना लेखराज याने त्यांच्याकडे दारू पिण्याकरीता पैसे मागितले. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावेळी लेखराजचा राग अनावर होत, त्याने रागाच्या भरात कुर्हाडीने सुलकनबाई यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आईचा खून केल्यानंतर लेखराजने स्वतःही शेजारील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती सालेकसा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. या प्रकरणी फिर्यादी गजेंद्र फत्तेलाल बनोटे ( वय ३४ रा. कुणबीटोला, ता. सालेकसा) यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मयुरी नागदिवे करीत आहेत.