विकसित महाराष्ट्र व आदिवासींच्या विकासासाठी महायुतीला विजयी करा
◾️उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन
गोंदिया : विकसित महाराष्ट्राचे ध्येय पूर्ण करण्यासाठी झटून काम करत असताना मागास क्षेत्र विकास आणि आदिवासी समाजाची प्रगती साधण्यासाठी अनेक योजना केंद्रातील मोदी सरकारच्या साथीने राज्यातील महायुती सरकारने राबवल्या आहेत. यापुढेही आम्हाला लोककल्याणाची कामे करून सर्वांचा विकास घडवून आणायचा आहे, पुन्हा महायुती सरकार निवडून आणण्यासाठी आशीर्वाद द्या असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी देवरी येथील प्रचार सभेत केले.
आमगांव – देवरी मतदार संघातील भाजपा – महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांच्या प्रचारार्थ झालेल्या या सभेला आ. डॉ. परिणय फुके, मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, आ. देवराव होळी, भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. येसुलाल उपराडे, माजी आमदार केशवराव मानकर, भेरसिंग नागपुरे, माजी जिप अध्यक्ष विजय शिवणकर, भंडारा – गोंदिया संपर्क प्रमुख बाळा अंजनकर, नरेश माहेश्वरी, मौसम बिसेन, रमेश भटेरे, अंबिका बंजार, सविता पुराम, देवकी मरई, अनिल येरणे, प्रज्ञा संगिडवार, कविता रहांगडाले, सुरेंद्र नायडू, सुरेश हर्षे, संजय उईके, रमेश ताराम, झामसिंग येरणे, प्रमोद संगिडवार आदी उपस्थित होते. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, येथील निष्क्रीय आमदारापेक्षा, 2019 ला पराभूत होऊनही परिसराच्या विकासासाठी संघर्ष करणाऱ्या संजय पुराम यांना यंदा आमदार बनवायचे आहे. राज्याला समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी सर्वांचा आणि सर्व क्षेत्रांचा विकास करण्याचे काम आमचे सरकार करत आहे.
अतिदुर्गम, डोंगराळ भागातही सरकारकडून पायाभूत सुविधा निर्माण करून आदिवासी बांधवांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. एकेकाळी विकासापासून वंचित राहिलेली गावे आज विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊन तेथील जनतेचे राहणीमान उंचावू लागले आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार विविध योजना राबवत आहे. आदिवासी बंधुभगीनींसाठी बिरसा मुंडा योजना, जनमन योजना, मोदी आवास योजना, शबरी, रमाई योजना, ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय, महाज्योती योजना, विद्यार्थ्यांसाठी 52 वसतिगृहे , परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना अशा अनेक योजनांमुळे आदिवासी परिसर आणि समाजाची उन्नती होत असल्याचे ते म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना, किसान सन्मान निधी योजना,सौर कृषी वाहिनी योजना, स्वतंत्र कृषी वीज वितरण कंपनी स्थापना, धानाचा बोनस जाहीर करणे अशी अनेक कामे केली आहेत. माताभगीनींसाठी लेक लाडकी, लाडकी बहीण योजना, एसटी प्रवास शुल्कात 50 टक्के सवलत, मोफत उच्चशिक्षण यासारख्या योजनांचा उल्लेखही यावेळी डीसीएम फडणवीस यांनी केला. पुन्हा तुमचा आशीर्वाद लाभला तर शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले जाईल, किसान सन्मान निधी ची रक्कम 12 हजारांवरून 15 हजार करण्यात येईल, लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करून ती 2100 रुपये करण्यात येईल. असा शब्दही त्यांनी दिला. सभेचे संचालन प्रवीण दहिकर यांनी केले.
०००००००००