गोंदिया जिल्ह्यात आभाळ फाटले !
◼️संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद
◼️गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय महामार्गासह ग्रामीण भागातील अनेक मार्ग बंद
गोंदिया (प्रमोद नागनाथे) : गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप कायम असताना काल दुपारपासून पावसाचा जोर वाढून रात्रीच्या सुमारास झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे संपूर्ण गोंदिया जिल्हा जलमय झालेला आहे. रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात आज, (दि. १०) अतिवृष्टीची नोंद झाली असून जिल्ह्यातील गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय महामार्ग बंद झाला असून ग्रामीण भागातील नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा तालुका व जिल्हा मुख्यालयाचा संपर्क तुटलेला आहे.
गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात कमीअधिक पावसाची नोंद होत आहे. त्यात काल (दि. ९) दुपारपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाघ इटियाडोह प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्वच मोठ्या धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पाण्याची वाढ झाल्याने धरण सुस्थितीत ठेवण्यासाठी जिल्ह्यातील शिरपूर, पुजारीटोला, कालीसराड धरणांचे वक्रद्वार उघडण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वैनगंगा नदीसह बाघ, पांगोली, चुलबंद आदी नद्यांना पूर आला असून रात्रभर पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने जिल्ह्यातील छोट्या नाल्यांनीही उग्ररूप धारण केले आहे. त्यामुळे अनेक गावांचा तालुका व जिल्हा मुख्यालयाचा संपर्क तुटलेला आहे. तर दुसरीकडे गोंदिया शहरात ही पावसाच्या पाण्याने हाहाकार माजविला असून अनेक घरात पावसाचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.
तर शहरातील होंडा शोरूम समोरील भागातील नाल्याला लागून असलेला घर कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संबधित विभागाकडून आज, मंगळवार १० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता घेण्यात आलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात १६७.४ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. यात तालुकानिहाय नोंदी पाहता सर्वच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून गोंदिया तालुक्यात २०७.९ मिमी. सरासरी पावसाची नोंद करण्यात आली असून आमगाव तालुक्यात १४०.० मिमी., तिरोडा ६३.७ मिमी., गोरेगाव १८२.८ मिमी., सालेकसा १९५.९ मिमी., २१०.३ मिमी., अर्जुनी-मोरगाव १४३.९ मिमी. तर सडक अर्जुनी तालुक्यात १८७.० मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
◼️देवरी तालुक्यात पाच जणांचा रेस्क्यू…
जिल्ह्यातील देवरी येथे बाघ नदी पात्रात अडकलेल्या दोन इसमांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्याचप्रमाणे तिघांना रेस्क्यू करुन शिरपूर येथील पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. गंगाबाई देशलहरी सतनामी ( वय ४०, ) देशलहरी सुनामी ( वय ४५) दोघेही राहणार खैरागड ( छ.ग.) अनिल सुरजभान बागडे (वय ३५ रा. शिरपूर बांध अशी तिघांची नावे आहे. त्याचबरोबर सालेकसा तालुक्यातील बरेचसे रोड, रस्ते बंद असून सुमारे १२ ते १५ नागरीकांना पूरस्थितीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
◼️डिझेल टँकर वाहून गेले…!
मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर येथील बाघनदी पुलावर काल, दुपारच्या सुमारास रायपूरकडून नागपूरकडे जात असलेल्या डिझेल टँकरला अपघात झाल्याने नदीत पडले होते. दरम्यान, सदर टँकर बाहेर काढण्यापूर्वीच शिरपूर धरणाचे वक्रद्वार उघडण्यात आले. त्यामुळे बाघ नदीला पूर आल्याने डिझेल टँकर वाहून गेल्याची घटना आज, सकाळच्या सुमारास उघडकीस आली. टँकर चालक सुखरूप असला तरी टँकर मात्र वाहून गेला असून टँकर वाहतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झालेला आहे.
◼️गोरेगावात १९ घरे व
७ गोठ्यांची अंशतः पडझड
रात्रभर झालेल्या पावसामुळे गोरेगाव तालुक्यातील १९ घरांची तर ७ गोठ्यांची अंशतः पडझड झाल्याची नोंद करण्यात आली असून तालुक्यातील गोरेगाव-कटंगी, कुऱ्हाडी-बोरगाव, सोनेगाव-शहारवानी, कुऱ्हाडी-मेघाटोला-बघोली, घोटी-म्हसगाव,
2 कुराडी ते बोरगाव रस्ता बंद
सोनेगाव-कवलेवाडा मार्ग नाल्यांना आलेल्या पुरामुळे बंद झाले आहे.