हिंदूंचा हिंदूराष्ट्राला नकार ;
सरसंघचालक नव्या भूमिकेत ?
देशाच्या तब्येतीवर हुकमी इलाज, लोकांचे राजकीयकरण (politicisation) होणे असते. यंदा ते बऱ्यापैकी झाले. निकाल बरा मिळाला.
सत्ता आणि स्वप्न, दोन वेगळ्या बाबी करुया. सत्ता मिळाली. स्वप्न भंगले. सल मोठी आहे. हे अचाट, एका राजकीयकरणाने केले. लोकांनी देशदृष्टीने विचार केला. आपले भले कशात आहे, ती समज (understanding) येणे हेच राजकीयकरण.
हिंदूंनी हिंदूराष्ट्राला नकार दिला. संघ शंभरीच्या तोंडावर हे घडले. धक्का मोठा आहे.
दिल्ली सत्तारोहणाच्या दुसऱ्या दिवशी सरसंघचालक मोहनराव भागवत नागपुरात बोलले. ते सारे माध्यमात आले नाही. एकाहून एक वक्तव्ये त्यांनी केली. मात्र, सुतळी वक्तव्यांना प्रसिध्दी दिली गेली. राजकीय सहमती व मणीपूर जळणे एव्हढेच मुद्दे प्रचारात आणले गेले. का असे ?
सामाजिक अस्वस्थता व असंतोष यावर ते बराच वेळ बोलले. सामाजिक रागाची ती व्यक्तता अनुल्लेखाने बाजूला ठेवली गेली.
सरसंघचालक पहिल्यांदाच हे बोलले. कदाचित संघ भूमिकेतही हे पहिल्यांदाच ! ते का बोलले, आताच का बोलले, काय विश्वासार्हता वगैरे चर्चा नंतर झाली असती. पण जे दीर्घ बोलले ते माध्यमात येऊच नये ? विस्मरणात टाकून दिले. विस्मरण असे की, संघ आणि मोदी, संघ आणि सरकार, संघ आणि भाजप अशीच चर्चा खूप असते. दोन्हीमध्ये फारसे सख्य नसल्याचे सांगितले जाते. चर्चा अशी सरकली जाते.
ज्या भाषणावरुन हे उठले ते भाषण तेव्हढेच होते का ? तेही विश्लेषण व्हायला हवे.
काय बोलले सरसंघचालक ?
कबीराचा दोहा, निर्बंधा बंधा रहे ..’ सांगून सरसंघचालकांनी भाषणाचा प्रारंभ केला. महाराणा प्रताप व भगवान बिरसा मुंडा यांचे दिवस असल्याने स्मरण केले. भाषणाला दिशा देतांना तथागताचे .., कुसलस्य उपसंपदा, पद उदघृत केले.
नंतर ताज्या राजकीय घडामोडींवर सौम्य-कडक भाष्य केले.
संस्कृत श्लोकांची पखरण करीत, विविधांगी आढावा घेतांना हिंदूभान होतेच !
पूढे ते म्हणाले, जगात भारताचे नाव होत असले तरी आव्हाने संपलेली नाहीत. यासाठी शांती हवी. कलह नको. एकमेकात अंतर नको. समाजात राग, मनमुटाव, चीड असल्याचे सांगतांना गरीबी, अस्पृश्यता व अल्पसंख्याक या तीन मुद्द्यांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बोट ठेवले. यासाठी पार्श्वभूमीचा आधार घेतला.
ते म्हणाले, फ्रांसीसी (फ्रेंच) राज्यक्रांती काय आहे. जेव्हा तिथे गरीबांचा असंतोष शिखरावर पोहचला तेव्हा तशी मने तयार झाली. असंतोषाला एकत्र करणाऱ्या नेत्यामागे लोक गेले. त्यांना सुटका हवी होती. तीच क्रांती. समाजपरिवर्तनानंतर असे व्यवस्था परिवर्तन होत असते.
असेच नंतर रशियातही घडले.
समाजात मोठ्या परिवर्तनाआधी आध्यात्मिक जागरण होत असल्याचे बाबासाहेब आंबेडकर म्हणाल्याचे ते म्हणाले.
आपल्याच देशात आपण काही बांधवांना अस्पृश्य केल्याचे सांगून ते म्हणाले, याला कोणताच आधार नाही. न्याय अन् शास्त्रात ते नाही. वेद व उपनिषदात असा कोणताच उल्लेख नाही.स्वार्थी लोकांनी विणलेले ते जाळे आहे. हे सर्व अविलंब भूतकाळात जमा केले जावे.
पूढे ते म्हणाले, आपल्या देशात आक्रमक आले. येतांना ते तत्वज्ञान घेऊन आले. त्याला काही लोक बळी पडले. आहेत ते मुळचे इथलेच. आता आमचेच श्रेष्ठ असा वाद नको. देश तुटेपर्यंत हा वाद गेलाय. ते विसरावे लागेल.
यापूढे कोणतेच मतांतरण नको. पैगंबर साहेबांचा इस्लाम व इसा मसीहची इसाईयत समजून घ्यावी लागेल.
या देशातील सर्व पुत्र हे भाऊ भाऊ आहेत. सर्वांच्यात रोटीबेटी व्यवहार होत असेल तर होऊ द्यावा.
शतकांच्या जडलेल्या सवयी सोडाव्या लागतील. अवघड आहे पण ते करावे लागेल, असेही ते म्हणाले.
हे सर्व सांगतांना, २०२५ ला संघाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत, याचा उल्लेख सुध्दा केला नाही !
० रणजित मेश्राम ,आंबेडकरी विचारवंत नागपुर..यांच्या फेसबुक वरुन