आय ए एस आपल्या भेटीला..
जर्मनीचे डॉ.सुयश चव्हाण मार्गदर्शन करणारअमरावती दि.२४- अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आयएएस अंतर्गत आयएएस आपल्या भेटीला या उपक्रमात यावेळेस जर्मनीमध्ये म्यूनीच येथे कार्यरत असणारे सुप्रसिद्ध आयएफएस अधिकारी डॉ.सुयश यशवंतराव चव्हाण हे मार्गदर्शन करण्यासाठी लाभणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे बुधवार दि. २५ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता झूम मीटिंगच्या माध्यमातून ते स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्यापकांना व पालकांना सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत .
ज्यांना या कार्यक्रमासाठी लिंक पाहिजे आहे त्यांनी त्यासाठी मिशन आयएएसचे संचालक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांच्याशी 9890967003 यावर संपर्क साधावा असे आवाहन मिशन आयएएस च्या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे .
डॉ.सुरेश यशवंतराव चव्हाण हे एमडी डॉक्टर असून त्यांनी आयएएसच्या परीक्षेत संपूर्ण भारतातून ५६ वे स्थान प्राप्त केले होते. आयएएस हा कॅडर मिळत असूनही त्यांनी भारतीय परदेश सेवेची निवड केली आहे. महाराष्ट्रातील १००० शाळांशी ते जुळलेले असून महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांचा सातत्याने सहभाग राहिलेला आहे .कोविडच्या काळात ५००भारतीय विद्यार्थ्यांना भारतात सुखरूप पोहोचवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे .
नुकत्याच पुणे येथे संपन्न झालेल्या जागतिक मराठी साहित्य संमेलनामध्ये त्यांना महाराष्ट्र सरकारने निमंत्रित केले होते. अशा या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सनदी अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाचा लाभ स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन मिशन आयएएसतर्फे करण्यात आले आहे.