मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी चुकलेल्या लाभार्थी महिलांनी दुरुस्तीसाठी पुढाकार घ्यावा
– जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते निर्देश
▪️30 एप्रिलपर्यंत करता येईल ऑनलाईन दुरुस्ती
▪️आपले सेवा केंद्रांवर ई-केवायसीची मोफत सुविधा
नागपूर, WH NEWS : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जिल्ह्यातील सर्व गरजु व पात्र लाभार्थी महिलांना लाभ मिळावा व कोणतीही पात्र बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने ई-केवायसीबाबत व्यापक मोहीम हाती घेतली आहे. ज्या लाभार्थी महिलांची यापूर्वी केलेली ई-केवायसी चुकलेली आहे अशा पात्र महिलांनी यात दुरुस्तीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्रांना लाडक्या बहिणींसाठी ही सुविधा विनाशुल्क करुन देण्याबाबत त्यांनी निर्देश दिले आहेत.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते निर्देश
नागपूर जिल्ह्यात सुमारे 10 लाख 90 हजार लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिला आहेत. यात काही पात्र बहिणींची ई-केवायसी चुकल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागले. महिलांनी यापूर्वी ई-केवायसी करतांना जर काही चुका केल्या असतील तर त्या दुरुस्त करता याव्यात यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्पर कार्यवाही करण्याबाबत राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्देश दिले होते.
ई-केवायसीमधील ही दुरुस्ती आता ऑनलाईन करता येईल. यासाठी दिलेल्या मुदतीला शासन निर्णयान्वये वाढ दिली असून आता दिनांक 30 एप्रिल 2026 पर्यंत ई-केवायसी करता येईल.
अशी करता येईल ई-केवायसी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना ई-केवायसीमध्ये ऑनलाईन दुरुस्ती करण्यासाठी सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून अथवा https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन ई-केवायसी लिंकवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर दिलेल्या रकान्यात आपला आधार क्रमांक टाकावा. यात ओटीपी असलेला नंबर टाकून पडताळणी करुन घ्यावी. त्यानंतर पर्याय क्रमांक एक व दोनची माहिती टाकून आपली ई-केवायसी सबमिट करावी.
