नागपूर महानगर भाजपची ‘SIR’ मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन
नागपूर: महाराष्ट्र राज्यात एप्रिल २०२६ पासून सुरू होणाऱ्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रियेच्या पूर्वतयारीसाठी आज नागपूर महानगर भारतीय जनता पक्षातर्फे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला राज्य SIR प्रमुख भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार किरीट सोमैया आणि विदर्भ संघटन मंत्री उपेंद्रजी कोठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आगामी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत या प्रक्रियेसाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले.
यावेळी संबोधित करताना शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र भाजप तर्फे राज्यभरातील एक लाख बूथ सक्रिय करण्यात आले असून कार्यकर्त्यांनी आता पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरावे. त्यांनी महानगरातील विधानसभा निहाय प्रमुख आणि कार्यकर्त्यांना आग्रह केला की, आपल्या क्षेत्रातील प्रत्येक मतदारापर्यंत वैयक्तिकरित्या पोहोचावे. ‘SIR’ प्रक्रियेच्या माध्यमातून एकही पात्र मतदार नाव नोंदणीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेणे हे कार्यकर्त्यांचे मुख्य ध्येय असले पाहिजे असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
या महत्त्वपूर्ण बैठकीच्या प्रसंगी मंचावर महामंत्री श्रीकांत आगलावे, संदीप जाधव, रितेश गावंडे, मनीषा धावडे आणि संपर्क महामंत्री विष्णू चांगदे यांची उपस्थिती होती. कार्यकर्त्यांनी केवळ मतदार नोंदणीवरच नव्हे,तर मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करून पारदर्शक नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी ‘मिशन मोड’मध्ये काम करावे, असे आवाहन नेत्यांनी केले. या बैठकीला नागपूर महानगरातील सर्व SIR विधानसभा प्रमुख आणि मोठ्या संख्येने प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
