सात दिवसांत खड्डेमुक्त रस्त्यांची मागणी; अन्यथा आमरण उपोषण – शिवसेना उपजिल्हाप्रमुख मधु माणके पाटील यांचा इशारा
नागपूर वाडी (15 जूलै) – मागील दोन वर्षांपासून वाडी शहरात सुरू असलेल्या भूमिगत सिव्हरेज लाईनच्या कामामुळे संपूर्ण शहरात रस्त्यांची दैना उडाली आहे. मँगोकीया ब्रदर्स प्रोजेक्ट प्रा. लि. या कंपनीमार्फत नगरपरिषदेच्या देखरेखीखाली सुरू असलेले हे काम नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहे.
शहरातील सुदृढ काँक्रीट व डांबरी रस्त्यांची खोदाई करून, नाल्या अपूर्ण व निकृष्ट दर्ज्याने बुजवण्यात आल्यामुळे संपूर्ण वाडी शहरात लांबच लांब, रुंद आणि खोल खड्डे निर्माण झाले आहेत. नुकत्याच झालेल्या ७ ते १० जुलैदरम्यानच्या सततधार पावसामुळे या कामाचे घोटाळे उघड झाले असून नागरिकांना गंभीर मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना उपजिल्हाप्रमुख मधु माणके पाटील यांनी ठेकेदार व वाडी नगर परिषदेच्या बांधकाम विभागावर रोष व्यक्त केला. त्यांनी मुख्याधिकारी मा. ऋचा धाबर्डे यांच्याकडे निवेदन देत, दत्तवाडी चौक ते हरिओम सोसायटी तसेच दत्तवाडी चौक ते रामकृष्ण सभागृह या मुख्य मार्गांवरील खड्ड्यांची त्वरित डागडुगी करण्याची मागणी केली आहे.
“सात दिवसांत जर दोषी ठेकेदारावर कारवाई करून रस्ते खड्डेमुक्त केले नाहीत, तर शिवसेना वतीने आमरण उपोषण करण्यात येईल,” असा कडक इशारा माणके पाटील यांनी दिला.
यावेळी दत्ता कॉम्प्लेक्स ते हरिओम सोसायटी व रामकृष्ण सभागृह मार्गावर २० फूट रुंदीचा सिमेंट काँक्रीट पेव्हिंग ब्लॉकसह पक्का रस्ता तयार करण्याची मागणीही करण्यात आली.
या आंदोलनात उपतालुका प्रमुख भाऊराव रेवतकर, उपशहर प्रमुख उमेश महाजन, वार्ड प्रमुख जगदीश पटले, सुनील पाटील, प्रमोदजी तराळेकर, राजू सहस्त्रबुद्धे, रमेश विलोनकर, राजू रिंके यांच्यासह अनेक त्रस्त नागरिक सहभागी झाले होते.