मृत व्यक्तीला दिला रहिवाशी दाखला! वाडी नगर परिषदचा धक्कादायक कारनामा उघड
निधनानंतर तीन वर्षांनी जारी झाला दाखला – प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह
वाडी, नागपूर (विजय खवसे ) –
वाडी नगर परिषदचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावाने राहिवाशी दाखला जारी करून नगर परिषद प्रशासनाने स्वतःच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
पुंडलिक बाजीराव मलग्राम, आंबेडकर नगर रहिवासी, यांचे 21 जून 2021 रोजी निधन झाले होते. याची नोंद नगर परिषदेकडे अधिकृतपणे उपलब्ध आहे. मात्र आश्चर्य म्हणजे, 9 जुलै 2024 रोजी त्यांच्याच नावाने रहिवाशी दाखला काढण्यात आला.
हा दाखला नेमका कोणाला दिला गेला? कोणी काढला? कोणत्या अधिकाऱ्याच्या सहीने दिला गेला? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे अद्यापही मिळालेली नाहीत. यात आर्थिक उलाढालीचा संशयही व्यक्त केला जात आहे.
गेल्या काही वर्षांत अनेक बोगस प्रकरणं वाडी नगर परिषद प्रशासनावर अशा प्रकारच्या आरोपांची ही पहिली वेळ नाही.2015 मध्ये एका खाजगी हॉस्पिटलने प्रशासक प्रशांत पाटील यांच्या बोगस सह्या करून परवानगी मिळवली होती. त्यानंतर जुम्मा प्यारेवाले यांच्या सहीचा ही दुरुपयोग करीत आणखी एका प्रकरणात बोगस अनुमतीपत्र जारी करण्यात आले. या सर्व प्रकरणांत आजवर कुठलीच ठोस कारवाई झाली नाही, ज्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढत गेला आणि असे गैरप्रकार सर्रास सुरू राहिले.
मुख्याधिकारी बदलले, पण कारभार तोच!
दाखला दिला गेला तेव्हा वाडी नगर परिषदचे मुख्याधिकारी विजय देशमुख होते. WH NEWS ने संपर्क साधल्यावर त्यांनी जबाबदारी थेट उपमुख्याधिकाऱ्यावर ढकलली. सध्याच्या मुख्याधिकारी ऋचा धाबर्डे यांनी सांगितले की, वरून आदेश मिळाल्यास चौकशी समिती स्थापन करून दोषींवर कारवाई केली जाईल
तक्रारदार शरद इंगळे म्हणाले…
शरद इंगळे यांनी या प्रकाराची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून त्यांनी म्हटले की, “जर मृत व्यक्तीच्या नावाने दाखला मिळू शकतो, तर वाडी नगर परिषदेत अजून किती फसवणूक सुरू आहे हे शोधायला हवे.”दोषीवर कार्यवाही झाली पाहिजे अशी मागणी शरद इंगळे यांनी केली.
“लाडकी बहीण” योजनेचाही गैरफायदा?
अहवालानुसार, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर हजारो राहिवाशी दाखले जारी करण्यात आले. त्यातील किती बोगस आहेत, हे आता नव्याने चौकशीतूनच समोर येऊ शकते.
नगर परिषदेत चाललेल्या या बेजबाबदार कारभारावर आता ठोस कारवाई होणार का?
की पुन्हा एकदा वाडी नगर परिषद “भगवान भरोसे” सोडण्यात येणार?असा प्रश्न तक्रार कर्त्यांनी प्रशासनास केला.
चौकशी करणार! माझ्या कडे अजून पर्यंत तक्रार आली नाही. वरून आदेश आले तर नक्की या प्रकरणी चौकशी समिती बसवून चौकशी करू दोषीवर कार्यवाही करणार
-ऋचा धाबर्डे, मुख्याधिकारी नप वाडी