दारूच्या नशेत भरधाव कार चालवून भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी,एकाचा मेडिकल मध्ये उपचार सुरु.
नागपूर,- पारशिवनी तालुक्यातील सिंगोरी गावात 22जून रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या चालकाने दोन मोटारसायकलांना जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी अविनाश निकोसे यांच्यावर नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात (वॉर्ड क्र. ३३) उपचार सुरू आहेत.
पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, हुंडाई आरा कार (क्रमांक MP 66 ZC 3097) चा चालक मार्तंड जगत सिंह (वय ३१, रा. सिंगाही, जि. सिंगरोली, म.प्र.) याने बेफिकीरपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवून हा अपघात घडवला. सिंगोरी येथील तेजराम जीवाजी रांगणकर (वय ४५) हे आपल्या शाईन मोटारसायकलवर (MH 40 BM 2215) शेताजवळील रस्त्याच्या कडेला उभे होते. त्याचवेळी दुसऱ्या मोटारसायकलवर (MH 40 CU 6220) अविनाश नानाजी निकोसे (रा. डोरली) हे केशव रामदास रंगारी आणि त्यांच्या पत्नी ललिता रंगारी यांना घेऊन सिंगोरीच्या दिशेने जात होते.भरधाव कारने प्रथम निकोसे यांच्या मोटारसायकलला धडक दिली, ज्यामुळे तिघेही रस्त्यावर फेकले गेले. यानंतर कार पुढे जाऊन तेजराम रांगणकर यांच्या मोटारसायकलवर आदळली.
या अपघातात केशव रामदास रंगारी (रा.बाबुलखेडा नागपूर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी ललिता रंगारी आणि अविनाश निकोसे गंभीर जखमी झाले. तेजराम रांगणकर यांनाही गंभीर दुखापत झाली.गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली. तेजराम यांना खासगी रुग्णालयात, तर इतर दोघांना पारशिवनी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारचालक मार्तंड सिंह याच्या तोंडाला दारूचा तीव्र वास येत असल्याने तो नशेत असल्याचा संशय आहे.या प्रकरणी श्रीकृष्ण माणिक रांगणकर यांच्या तक्रारीवरून पारशिवनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चालक मार्तंड सिंह याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.कार मालक रजनी सिंह असल्याचे समजले.