१२ वी परीक्षेत गोंदिया जिल्हा विभागातून अव्वल
◼️जिल्ह्यातून आदेश देशमुख प्रथम
गोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी च्या परिक्षेचा निकाल आज, (दि.२१) मंडळाकडून जाहीर करण्यात आला. ज्यामध्ये नागपूर विभागातून गोंदिया जिल्हा अव्वल स्थानावर असून अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी आदेश शरद देशमुख ९५.५० %(५७३) गुण प्राप्त करीत जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
जिल्ह्यात यावर्षी १२ वी च्या परिक्षेकरीता १९ हजार १४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १९ हजार ७९ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. दरम्यान, १८ हजार १७२ विद्यार्थी हेे उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याची निकालाची टक्केवारी ९५.२४ एवढी आहे. नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्याने निकालात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी विज्ञान शाखेतून आदेश शरद देशमुख ९५.५०%(५७३) गुण प्राप्त करीत जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला तर कु. लीना दुर्योधन मडावी ९३.६७% (५६२) गुणांसह जिल्ह्यातून द्वितीय व मुलींमधून प्रथम ठरली आहे. याच प्रमाणे कला शाखेतून कु. प्रेरणा अशोक दहिवले ९०% (५४०) गुणांसह जिल्ह्यातून द्वितीय आली आहे. आदेश देशमुख हा विद्यार्थी दहावी बोर्डाच्या परीक्षेत सुद्धा शाळेतून प्रथम आला होता हे विशेष. जिल्ह्यातील ११६ विद्यालयांनी विज्ञान,वाणिज्य व कला शाखेत १०० टक्के निकाल दिला आहे.यामध्ये कला शाखेचे १९, टेक्नीकल १, व्होकेशनल २, वाणिज्य शाखेत ७ तर विज्ञान शाखेचा ८७ विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागलेला आहे. यात जिल्हा परिषद व शासकीय आश्रमशाळांनी निकालाच चांगली भरारी घेतली आहे.
गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्याचा सर्वाधिक निकाल ९७.८१ टक्के असून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. द्वितीय क्रमांक सडक अर्जुनी तालुक्याने ९६.७९ टक्के निकाल लावून पटकावला आहे.तर तृतीय क्रमांक ९५.३६ टक्के निकाल लावत तिरोडा तालुक्याने पटकावला आहे. सर्वाधिक कमी निकाल गोरेगाव तालुक्याचा ९१.९७ टक्के लागला आहे. गोंदिया तालुक्यात ६५६७ विद्यार्थी परिक्षेकरीता नोंदणी करण्यात आले होते. त्यापैकी ६५४४ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असून ६२१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गोंदिया तालुक्याचा निकाल ९५.०३ टक्के असून मुलींच्या निकालाची टक्केवारी ९६.२६ आहे.आमगाव तालुक्यात १७४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी १७४० विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असून १६४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आमगाव तालुक्याची निकालाची टक्केवारी ९४.७७ टक्के असून तालुक्यात मुलींचे प्रमाण ९६.७० टक्के आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात २४३३ विद्यार्थ्यांनी नोंंदणी केली.
त्यापैकी २४१२ परिक्षेत सहभागी झाले.तर २३६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याची टक्केवारी ९७.८१ असून मुलींची टक्केवारी ९८.७५टक्के आहे. देवरी तालु्क्यात १२३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १२३१ परिक्षेत सहभागी झाले व ११६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.निकालाची तालुक्याची टक्केवारी ९४.८८ असून मुलींचे उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९७.४७ आहे. गोरेगाव तालुक्यात १६११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली,त्यापैकी १६०८ विद्यार्थी परिक्षेला बसले. यातील १४७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून टक्केवारी ९१.९७ एवढी आहे.तर मुलींची टक्केवारी ९६.०६ टक्के आहे. सडक अर्जुनी तालुक्यात १६२९विद्यार्थ्यांनी नोंदणी केली,त्यापैकी १६२४ परिक्षेला बसले.तर १५७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याची टक्केवारी ९६.७९ आहे. तालुक्यात मुलींचे प्रमाण ९७.९७ टक्के आहे. सालेकसा तालुक्यातील १५०२ विद्यार्थीपैकी १४९३ परिक्षेला बसले. त्यापैकी १४११ विद्यार्थी विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले असून तालुक्याच्या निकालाची टक्केवारी ९४.५० टक्के एवढी आहे.तालुक्यात ९६.१८ टक्के मुलींचे प्रमाण उत्तीर्ण होण्याचे आहे. देवरी तालुक्यातील २४२४ विद्यार्थ्यापैकी २४१८ विद्यार्थी परिक्षेला बसले आणि २३०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याच्या निकालाची टक्केवारी ९५.३६ टक्के असून मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९८.५० टक्के एवढे आहे.