शंभर बालकांना श्रामणेर दीक्षा
-दीक्षाभूमीवर बुद्ध महोत्सवाला प्रारंभ
-भदन्त ससाई यांच्याकडून त्रिशरणासह दशशील ग्रहण
-श्रामणेर समारंभ उत्सवासारखा साजरा करा
नागपूर, 4 मे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे पवित्र दीक्षाभूमी येथे चार दिवसीय बुद्ध महोत्सवाला प्रारंभ झाला. बुद्धजयंतीच्या पूर्वसंध्येला गुरूवारी सायंकाळी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्म सेना नायक भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते शंभर बालकांसह ज्येष्ठांनाही श्रामनेरची दीक्षा दिली. यावेळी बालक आणि त्यांचे पालकही उपस्थित होते.
दीक्षाभूमीच्या प्रांगणात लहान लहान बालक डोक्यावरचे केस काढून पालकांसह उपस्थित झाले. श्रामनेरची दीक्षा घेण्यासाठी सर्व बालक रांगेनी बसले. त्यांच्या पाठीमागे पालक बसले होते. पालकांचा आशिर्वाद घेतल्यानंतर बालकांनी भिक्खुचेही आशीर्वाद घेतले. अंगावर काशाय वस्त्र धारण केल्यानंतर त्रिशरणासह दशशील भदन्त ससाई यांच्याकडून ग्रहण केले. सोबतच आयुष्यभर दहा शीलांचे पालन करण्याचे व्रत त्यांनी घेतले. यावेळी ससाई यांनी श्रामनेरांना चिवरचे महत्व सांगितले. आता तुम्ही बुध्दाचे शिष्य झालात, यापुढे तुम्हाला तथागताने सांगितलेल्या मार्गाचे अनुसरण करायचे आहे. यावेळी त्यांचे नामकरणही करण्यात आले. काशाय वस्त्रधारी श्रामनेर सोहळा ‘बुद्धं सरणं गच्छामि’च्या स्वरात निनादला. उंटखाना येथील बुद्धिस्ट सेमिनरीत श्रामणेरांना निवासी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. या शिबिरादरम्यान भिक्खू संघ पाच दिवस बुद्ध, धम्म आणि संघ याविषयी मार्गदर्शन करतील.
यावेळी ससाई यांनी मार्गदर्शन केले. गृहस्थ जीवनात प्रवेश करणारा समारंभ थाटात साजरा केला जातो. शुभेच्छांचा वर्षाव करतात. नवीन कपडे खरेदी करतात. अगदी त्याच प्रमाणे श्रामनेर हा सुध्दा एक समारंभच आहे. पालकांनी एखाद्या उत्सवाप्रमाणे थाटात समारंभ साजरा करावा, असेही भदन्त ससाई म्हणाले. याप्रसंगी भदन्त थेरो धम्मसारथी, भदन्त थेरो नागवंश, भंदन्त धम्मप्रकाश, भदन्त भीमा बोधी, भदन्त नागसेन, भदन्त धम्मविजय, भदन्त मिलिंद, भदन्त नागाप्रकाश, भदन्त अश्वजित, भदन्त राहुल, भिक्खुनी किसा गौतमी, शीलानंदा, संघशिला, विशाखा, धम्मप्रिया, कुंडलिका, भिक्खूनी संघप्रिया उपस्थित होत्या.
कार्यक्रमाला दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांच्यासह समितीचे सदस्य, समता सैनिक दलाचे प्रदीप डोंगरे, बालकदास बागडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवी मेंढे यांच्यासह भिक्खु, भिक्खुनी, उपासक उपासिकांनी सहकार्य केले.
भिक्खु संघाचे आज प्रवचन
भदन्त ससाई यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (5 मे) सायंकाळी 6 वाजता भदन्त नागवंश, भदन्त धम्मप्रकाश, भिक्खूनी संघप्रिया, नागकन्या, शीलानंदा आदींसह भिक्खू संघ करूणा, शांती, मैत्री आणि बुद्धाचा कल्यानाचा मार्ग यावर प्रवचन होईल.