विद्यार्थ्यांचा जीव गेल्यावर जाग येईल काय ?
◾️अंभोरावासियांचा शिक्षण व परिवहन विभागाला सवाल
▪ अंभोरा ते केशरी मार्गावर बस सुविधा उपलब्ध करण्याची मागणी
गोंदिया : शासनाने पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण केले आहे. कायद्याअंतर्गत आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे बंधनकारक असताना गावात केवळ चौथीपर्यंतची शाळा असल्याने अल्पवयीन चिमुकल्या विद्यार्थ्यांना त्यापुढील शिक्षणासाठी तब्बल ५ किलोमीटरचे अंतर जंगलातून पायी अथवा सायकलने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने वन्य प्राण्यांकडून एखादी जीवितहानी झाल्यावर शिक्षण व परिवहन विभागाला जाग येईल काय ? असा संतापजनक सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांच्यासह येथील नागरिकांनी केला आहे. तर अंभोरा ते केशोरी मार्गावर तात्काळ बस सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.
आंभोरा येथे इयत्ता चौथी पर्यंतची शाळा आहे. यापुढील शिक्षणासाठी गावातील विद्यार्थ्यांना ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या केशोरी येथे जावे लागते. अंभोरा येथील जवळपास ५० ते ६० विद्यार्थी प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी तब्बल ५ किलोमीटर अंतरावर पायी अथवा सायकलने प्रवास करतात. दरम्यान, आंभोरा ते केशरी हा प्रमुख मार्गावर असून हा जंगलव्याप्त भाग आहे. या जंगलात वाघ, बिबट, रानगवे, अस्वल यासह अन्य वन्य प्राण्यांचा नियमित वावर आहे. मागील वर्षभरापूर्वी या मार्गावरून आवागमन करणाऱ्या ४ ते ५ नागरिकांचा वाघाने बळी घेतला होता. गावातील नागरिकांनी कित्येकदा या मार्गावरून बस सुविधा उपलब्ध करण्याची मागणी शासन प्रशासनाला केली. मात्र, या मागणीकडे शासन प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
◾️आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून सक्तीचे व मोफत शिक्षण दिले जात असतानाच मागील कित्येक वर्षापासून या गावातील विद्यार्थी जीव मुठीत घेऊन भर जंगलातून सायकल अथवा पायी शाळेत जात आहेत. या परिसराला भेट दिली असता तेथील वास्तव समोर आले. तेव्हा शिक्षण विभागासह परिवहन विभागाने याकडे लक्ष देत अंभोरा ते किशोरी मार्गावर पुढील ८ दिवसांत बस सुविधा उपलब्ध करा अन्यथा गावकऱ्यांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल.
–मिथुन मेश्राम, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट