राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न जयंत पाटील यांनी सोडून द्यावे – चंद्रशेखर बावनकुळे
नागपुर – राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जादुटोणा केला आणि राज्यात बेईमानीने सत्ता मिळविली . पण आम्ही सावध आहोत . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही किमान दोनशे जागा जिंकू . त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यानी आता राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न सोडून दिले पाहिजे , असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा . चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी सांगितले . ते सातारा जिल्ह्याचा संघटनात्मक प्रवास करत असून पत्रकार परिषदेत बोलत होते .
यावेळी भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष आ . जयकुमार गोरे , छत्रपती आ . शिवेंद्रराजे भोसले , प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील व प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ उपस्थित होते . तत्पूर्वी सकाळी त्यांनी श्रीमंत छत्रपती खा . उदयनराजे भोसले यांची भेट घेतली . राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या टिप्पणीविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता मा . चंद्रशेखर बावनकुळे यानी वरील प्रतिपादन केले . उद्धव ठाकरे याच्यावर जादुटोणा करणारे भोंदूबाबा कोण आहे , असे विचारले असता त्यांनी ते सर्व देशाला आणि महाराष्ट्राला माहिती आहे , असे उत्तर दिले . एकदा कोणी शरद पवार यांच्या तावडीत सापडले की , सुटत नाही , असेही ते म्हणाले . महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाचे सर्व काही स्वीकारले आहे . आता फक्त काँग्रेसचे संविधान त्यांनी स्वीकारायचे बाकी आहे .
आपल्या पक्षाचे संविधान म्हणून काँग्रसेच्या संविधानाची नक्कल करून निवडणूक आयोगाला सादर करावी , असाही टोला मा . बावनकुळे यांनी हाणला . ते म्हणाले की , प्रतापगडावर अफजलखानाच्या कबरीजवळचे अतिक्रमण हटवावे म्हणून विश्व हिंदू परिषद , शिवप्रतापगड उत्सव समिती , हिंदू एकता आंदोलन अशा अनेक हिंदुत्ववादी संघटनानी आंदोलने केली . मताच्या राजकारणासाठी आणि लांगुलचालनामुळे उद्धव ठाकरे सरकारला हे अतिक्रमण काढण्याची हिंमत झाली नाही . पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अतिक्रमण हटविले याबद्दल आपण सरकारचे अभिनंदन करतो .
प्रतापगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी आपण सरकारला विनंती करू , असेही ते म्हणाले . सातारा नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबाची शिवसेना युती असेल व युतीचाच नगराध्यक्ष होईल . भाजपाचे उमेदवार पक्षाच्या चिन्हावर लढतील व विजयी होतील , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .