रामटेक पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाचे 22 रोजी उद्घाटन.
-शहनाज अख्तर, उदित नारायण, सुखविंदर सिंग यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’
-‘रामायण’ महानाट्यासह स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम
नागपूर – प्रसिद्ध तीर्थस्थळ आणि पर्यटनाचे आकर्षण असलेल्या रामटेक येथे 22 ते 24 जानेवारी दरम्यान होत असलेल्या तीन दिवस पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन बुधवार, 22 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता रामटेक येथील नेहरू मैदानावर होत आहे.
केंद्रीय परिवहन, महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त, नियोजन, कृषी, मदत, पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, लोकसभा सदस्य श्यामकुमार बर्वे, विधानपरिषद सदस्य अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, डॉ. परिणय फुके, कृपाल तुमाने, विधानसभा सदस्य डॉ. नितीन राऊत, कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, मोहन मते, विकास ठाकरे, समीर मेघे, चरणसिंग ठाकूर, आशिष देशमुख, संजय मेश्राम यांची उपस्थिती राहणार आहे.
पहिला दिवस होणार ‘राममय’
रामटेक पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर होत असलेल्या या महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उद्घाटन कार्यक्रमापूर्वी 5.30 वाजता सुप्रसिद्ध भजन गायिका शहनाज अख्तर यांचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 7 वाजता भव्यदिव्य ‘रामायण’ हे महानाट्य सादर केले जाणार आहे. प्रसिद्ध अभिनेते पुनीत इस्सर आणि सिद्धांत इस्सर लिखित, दिग्दर्शित व निर्मित या संगीतमय महानाट्यात भगवान श्रीरामाची भूमिका सिद्धांत इस्सर करणार आहेत. मा सीतेची भूमिका शिल्पा रायझादा, रावणाची भूमिका पुनीत इस्सर, हनुमानाची भूमिका विंदू दारा सिंग करतील. इतर भूमिकांमध्ये अन्य 25 कलाकार आहेत.
दोन ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’
गुरुवार 23 रोजी ‘पापा कहते है’ फेम पद्मभूषण, पद्मश्री उदित नारायण यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ आयोजित करण्यात आली असून शुक्रवार 24 रोजी ‘छय्या छय्या’ फेम सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ रामटेकच्या नागरिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
स्थानिक कलाकारांचा सहभाग
या तीन दिवसीय महोत्सवात मुख्य कार्यक्रमांव्यतिरिक्त स्थानिकांसाठी रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, सायकल स्पर्धा, पॅरामोटर, मातीकला स्पर्धा, नौका स्पर्धा, स्केटिंग अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, फूड फेस्टिव्हल, हॉट एअर बलून आणि महिला बचत गटाचे स्टॉल प्रदर्शनही राहणार आहे.
या अभूतपूर्व महोत्सवाचा आनंद घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पर्यटन संचालनालय मुंबईचे संचालक डॉ. बी.एन. पाटील आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.