मोकाट श्वानांचा एकाच दिवशी 20 जणांना चावा
◼️ गोंदिया शहरात दहशतीचे वातावरण
गोंदिया : शहरातील विविध विभागात मोकाट कुत्र्यांनी एकाच दिवशी तब्बल 20 जणांना चावा घेतला. ही बाब 21 मार्च रोजी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आलेल्या जखमी रुग्णांच्या संख्येने समोर आली. दरम्यान, यातील गंभीर जखमींना रेबीज व एआरएस सिरम डोज देण्यात आला आहे.
शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर राहतो. मुख्य मार्गावरील मोकाट जनावरांमुळे अपघातही घडले आहेत. मागील काही महिन्यापासून मोकाट कुत्र्यांचा शहरात हैदोस वाढला आहे. काही परिसरातील मोकाट कुत्रे वाहनांमागे धावत असल्याने अपघातही घडले आहे. तर अनेकजण कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमीही झाले आहेत. मात्र यानंतरही कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी असलेले नगर परिषद प्रशासन गप्प बसल्याचे दिसून येते. काल, 21 मार्च रोजी शहरातील गणेशनगर, गोविंदपूर, सिंधी कॉलनी, रामनगर परिसरात मोकाट कुत्र्यांसह एक पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला. यात 20 जण जखमी झाले.
यात 11 महिला व 9 पुरुषांचा समावेश असून बहुतांशजण 50 वर्षापेक्षा अधिक वयाचे आहेत. ही बाब जखमी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आल्यावर समोर आली. दरम्यान नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे पथक पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी पाठविण्यात आले, मात्र तो मिळून आला नाही. यामुळे शहरात दहशतीचे वातावरण आहे.
◼️सात महिन्यात 1633 जण जखमी…
शहरातील ऑगस्ट 2023 ते फेब्रुवारी 2024 या 7 महिन्यात 1633 नागरिक मोकाट कुत्र्यांच्या चाव्याने जखमी झाले. माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात दोन बालकांचा व मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात एक बालकाचा रेबीज आजाराने मृत्यू झाल्याचे कळते.
◼️पालिका प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह…
प्राणी संरक्षण नियमानुसार मोकाट कुत्र्यांना ठार मारण्यास प्रतिबंध आहे. मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर आळा घालण्याकरिता नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येते. यासाठी नगर परिषदेतर्फे काही महिन्यपूर्वी निविदा करण्यात आली. परंतु आतपर्यंत त्यावर अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
◼️लवकरच नसबंदी शस्त्रक्रिया
मोकाट कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया निविदा काही महिन्यापूर्वी काढली असून आरोग्यविभागाला त्यावर अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. लवकरात लवकर मोकाट कुत्र्यांना पकडून नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येतील. तसेच पिसाळलेल्या कुत्र्यांना पकडण्याचे निर्देशही दिले आहेत.
सुनील बल्लाळ
प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद गोंदिया