महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांनी फोडला प्रचाराचा नारळ
◾️श्री दत्त मंदिरात पुजन करून प्रचाराला सुरवात
गोंदिया : आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांनी मंगळवार (ता. ५) देवरी तालुक्यातील हरदोली येथील दत्त मंदिरात पूजा करून प्रचाराला सुरवात केली.
जिल्ह्यातील देवरी-आमगाव मतदारसंघात महायुतीतून भाजपचे माजी आमदार संजय पुराम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारी त्यांनी देवरी तालुक्यातील हादरली येथील दत्त मंदिरात पुजन करून आपल्या प्रचाराला सुरुवात केली. विशेष म्हणजे पुराम यांना भारतीय जनता पक्षाने सतत तिसऱ्यांदा निवडणूक लढण्याची संधी दिली असून २०१४ ते २०१९ पर्यंत ते आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रात आमदार राहीले आहेत. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. दरम्यान, यावर्षी पुन्हा त्यांच्यावर भाजपने विश्वास दाखविला आहे. दरम्यान, संजय पुराम यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्याला पक्षाने निवडणूक लढण्याची तिसऱ्यांदा संधी दिली असून आपलाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर महायुतीमध्ये बंडखोरीचा कुठलाही परिणाम होणार नाही असेही संजय पुराम म्हणाले.
◾️आमदार विनोद अग्रवाल यांनीही केला श्रीगणेशा
गोंदिया विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार विनोद अग्रवाल यांनीही मंगळवारी आपल्या प्रचाराला सुरुवात केली. गोंदिया तालुक्यातील नागरा येथील प्राचीन शिव मंदिरातून पूजा अर्चना करून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली. आतापर्यंतच्या इतिहासात कधीही गोंदिया विधानसभेवर कमळ चुनाव चिन्हावर कोणीही जिंकून आलेला नाही, त्यामुळे यावेळेस निश्चितच इतिहास घडणार आणि कमळ चिन्ह या ठिकाणी जिंकेल असा विश्वास आमदार विनोद अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केला.
००००००