भरधाव कारच्या धडकेत भाजीपाला विक्रेता ठार
गोंदिया : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार भाजीपाला विक्रेता गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू त्याचा झाल्याची घटना देवरी-चिचगड मार्गावरील फुटाना फाट्याजवळ रविवारी (ता.२४) सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीचा चंदामेंदा झाला. रूपचंद कारू कोरे (वय५८) रा.पदमपुर ता. देवरी असे त्या भाजीपाला विक्रेत्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार,मृत रूपचंद कोरे यांनी पोटाची खळगी भरण्याकरिता, शेतीला जोड व्यवसाय म्हणून, मागील सहा वर्षापासून गावाशेजारील खेड्यापाड्यात जाऊन भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. दरम्यान, काल रविवारी भाजी विक्री करून आपल्या दुचाकी क्र. एम. एच.३५ ए.क्यू.७८६० ने देवरी-चिचगड मार्गावरून राहत्या घरी येत असताना फुटाणा फाट्यानजीक बोडीजवळ विरुद्ध दिशेने भरधाव येणारी कार क्र. सी.जी. ०८ ए.यु. ७४१९ ने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीचा चेंदामेंदा होवून, रुपचंदला गंभीर दुखापत झाली. त्याला प्राथमिक उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय देवरी येथे दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी गोंदिया येथे हलविण्याचा सल्ला दिला. दरम्यान, त्यास गोंदिया येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास चिचगड पोलीस करीत आहे.