डॉ. आंबेडकर रुग्णालय दुसरीकडे हलवून उत्तर नागपूरच्या विकासाला राज्य सरकारचा विरोध
-सातव्या दिवशीही आंदोलन सुरूच; नागरिकांचा आंदोलनाला वाढता समर्थन
नागपूर, WH न्यूज़ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र उत्तर नागपूर येथून दुसरी कडे नेण्याचे राज्य सरकारचे षडयंत्र म्हणजे राज्य सरकारचा उत्तर नागपूरच्या विकासाला विरोध आहे. असे मत आज इंदोरा, कामठी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रा समोर सुरु असलेल्या आंदोलनात नागरिकांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव कृती समिती द्वारे रुग्णालयाचे भूमिपूजन व बांधकाम तात्काळ करण्याच्या मागणीकरिता सुरु असलेल्या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस होता. आज सकाळ पासून अश्विन कुंभलवार, अंकेश सहारे, सत्येन कोतूलवार, बसंत मुंघाटे आणि ममता गणवीर यांनी साकळी उपोषणात सहभाग घेतला. आज राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. आज अखिल भारतीय भिक्कू संघ महाराष्ट्राचे महासचिव भदंत ज्ञानज्योती महाथेरो, भदंत प्रियदर्शी महाथेरो, छाया खोब्रागडे, बंडोपंत टेम्भूर्णे, मनोज बंसोड, दिनेश अंडरसहारे, सुरेश पाटील, शेख शहाब्बूदीन, पुष्पलता सहारे, गजानन जांगळे आणि दिनेश यादव प्रामुख्याने उपस्थित होते.
आंदोलनाला दररोज नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत आहेत. रुग्णालयाकरिता आंदोलन स्थळी तरुणांची, वयोवृद्धाची, महिलांची आणि पुरुषांची उपस्थिती लक्ष वेधणारी होती. रुग्णालयाकरिता नागरिक दररोज आंदोलन स्थळी येऊन आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. डॉ. नितीन राऊत यांच्या अथक प्रयत्नाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्राचे श्रेणीवर्धन झाले असून सदर प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकार ने 1165 कोटी रुपयाची मंजुरी दिली. राज्यातील शिंदे – फडणवीस – पवार सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र इतरत्र हलविण्याचे षडयंत्र करुन नागरिकांची फसवणूक करित असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. हे प्रकल्प उत्तर नागपूरातच बांधण्यात यावे व तात्काळ भूमिपूजन करुन बांधकाम करण्याची मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी केली.
आंदोलना करिता सहायता निधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव कृती समिती द्वारे रुग्णालयाच्या भूमिपूजन आणि बांधकाम करिता संविधान दिन 26 नोव्हेंबर पासून बेमुद्दत जनआंदोलन सुरु आहे. आंदोलन करिता लागणाऱ्या खर्च करिता आंदोलन स्थळी सहायता निधी करिता पेटी ठेवलेली आहे. या पेटीत आंदोलन स्थळी येणाऱ्या नागरिकांद्वारे सहायता निधी देण्यात येते. नागरिकांच्या सहयोगातून या आंदोलनाचा खर्चा केला जात आहे.
उद्या साकळी उपोषणात आर.पी.आय.सेक्युलरचे दिनेश अंडरसहारे, रत्नमाला गणवीर, प्रणिता गणवीर, अमर सूर्यवंशी, आशिष मेश्राम तसेच जयभीम मित्रमंडळाचे त्रिशरण सहारे, संकेत बुरबुरे आणि अक्षय खोब्रागडे सकाळ पासून सहभाग घेतील.
*सीपीआई नेते डी. राजा यांचा आंदोलनाला पाठिंबा*
शुक्रवार ला राज्यसभेचे माजी सदस्य आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस श्री.दोराईसामी राजा (डी. राजा) नागपूर दौऱ्यावर होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डी. राजा यांच्याशी भेट घेऊन त्यांना आंदोलना बाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी कृती समिती तर्फे सुरु असणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी रुग्णालय बचाव कृती समितीचे दिनेश अंडरसहारे, महेंद्र भांगे, जगदीश गजभिये, अमर सूर्यवंशी आणि उमर खान उपस्थित होते.
प्रख्यात वक्ते व दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. लक्ष्मण यादव यांचा आंदोलनाला समर्थन
प्रख्यात वक्ते व दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. लक्ष्मण यादव यांनी आज इंदोरा, कामठी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रा समोर सुरु असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव कृती समितीच्या बेमुद्दत जनआंदोलनात सहभाग घेतला व आंदोलनाला आपला पाठिंबा दिला.