झाडाझडती….✍️विनोद देशमुख(नागपुर)
——————————————
आणिबाणीतील अत्याचार
अन् सध्याचे स्वैराचार
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, याचा निषेधच केला पाहिजे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कोणत्या स्तरापर्यंत खाली घसरत आहे, त्याचे हे एक उदाहरण होय. कंबरेचे सोडून डोक्याला गुंडाळलेले काही बेताल नेते सध्या शिवीगाळ, अश्लील भाषा, धमक्या यांचे उघड प्रयोग करून राज्यातील वातावरण नासवत आहेतच. अशात हल्ले, मारहाण वगैरेंमुळे महाराष्ट्राचा बिहार-बंगाल होतो की काय, अशी भीती वाटायला लागली आहे.
अशा स्थितीत अशोक चव्हाणांनी प्रतिक्रिया व्यक्त करणे स्वाभाविक आहे. परंतु, संतापाच्या भरात आपण काय बोलून गेलो, याचे भान त्यांना राहिलेले नाही दिसत नाही. ते काय म्हणाले पाहा. नांदेडच्या एका कार्यक्रमात ते बोलले- “सरकारच्या विरोधात बोलल्यास जीवे मारण्याचे प्रयत्न होत आहेत. आणिबाणीतही जे घडले नाही, अशा घटना देशात घडत आहेत. सरकारचे गुणगान केले तर बरे. अन्यथा काही खरे नाही.”
विरोधी पक्षाचा नेता सरकारविरोधी बोलला, यात आश्चर्य काही नाही. पण, सध्याच्या स्थितीला आणिबाणीपेक्षाही वाईट ठरवणारे विधान करायचे, म्हणजे फारच झाले. यातून “आणिबाणी पुष्कळच बरी होती” असा अर्थ निघतो, तो पूर्णत: चुकीचा, खोटारडा आणि लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणारा आहे. आणिबाणी हा भारतीय लोकशाहीतील सर्वात काळा कालखंड होता आणि आतापर्यंतचे सर्वाधिक ‘सरकारी अत्याचार’ याच 21 महिन्यांमध्ये झाले, हे ऐतिहासिक सत्य आहे.
लोकशाहीवरील तो कलंकच आहे. राजकीय विरोधकांची सरसकट धरपकड, सुनावणी न होऊ देणारा ‘मिसा’ कायदा, तुरुंगवासामुळे अनेकांचे मृत्यू, जबरदस्तीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, अटकेमुळे हजारोंच्या नोकऱ्या जाणे, पोलिस आणि सत्ताधारी काॅंग्रेसच्या नेत्यांची दहशत यामुळे देशातील लोकशाही मरण पावली होती अशी स्थिती आज आहे काय ? तरी तुलना केली जाते तेव्हा, आणिबाणीचे छुपे समर्थन करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी शंका घेण्यास जागा होते.
आणिबाणीत जीवे मारण्याच्या धमक्या नव्हे, थेट मारण्यातच आले विनाकारण जेल झालेल्या विरोधी पक्ष कार्यकर्त्यांपैकी अनेक जण मृत्युमुखी पडले. यात रा. स्व. संघ, समाजवादी, कम्युनिस्ट अशा वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक होते. काॅंग्रेसच्या नेत्यांनी नावे देऊन देऊन अटक करायला लावण्याचे प्रकार घडले. आमच्याच कुटुंबातील उदाहरण घ्या. माझे आजोबा (वडिलांचे काका) अॅड्. नारायण हनुमंतराव उपाख्य बाबुराव देशमुख राजुरा (चंद्रपूर) तालुका संघचालक होते. वय वर्षे 80. (त्यांच्यापासून देशाला धोका होता) एका पहाटे त्यांना घरून उचलून थेट नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातच डांबण्यात आले. तुरुंगवासाचा त्यांना त्रास झाला आणि तब्येत खालावू लागली.
डाॅ. रामचंद्र लाखे (हे पूर्वी राजुऱ्याच्या सरकारी दवाखान्याचे प्रमुख होते) यांच्या शिफारसीवरून त्यांना कसेबसे सोडण्यात आले. 28 आॅक्टोबर 1976 रोजी आजोबा राजुऱ्याला परत आले आणि तिसऱ्या दिवशी 30 आॅक्टोबरच्या पहाटे निधन पावले. याला आणिबाणीचा बळी नाही तर दुसरे काय म्हणायचे ?
सरकारच्या दडपशाहीमुळे असे बाहेर आणि तुरुंगात कितीतरी बळी गेले. सध्या असे किंवा यासारखे अन्य प्रकार होत आहेत का ? कशाच्या भरोशावर अशोक चव्हाण आजच्या परिस्थितीला आणिबाणीपेक्षा भयानक अन् आणिबाणीला सौम्य ठरवू पाहत आहेत ? हजारो कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी आणिबाणी कोठे आणि पंतप्रधान मोदींच्या नावाने वाट्टेल तसे लिहिण्याबोलण्याची मुभा असणारी आजची व्यवस्था कोठे ? तुलनाच केली जाऊ शकत नाही.
उलट, ज्या मविआ सरकारमध्ये चव्हाण मंत्री होते, त्यांच्याच काळात सरकारविरोधात बोलणाऱ्या-लिहिणाऱ्या मंडळींचा कसा छळ झाला, त्याच्या कथा अजूनही ताज्या आहेत. ती अडीच वर्षे अनेक लोकांसाठी अक्षरश: दहशतीतच गेली. आणिबाणीसारखाच तो काळ राहिला. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पत्रकार अर्णव गोस्वामी यांना ज्या पद्धतीने अटक करण्यात आली ते प्रसंग आठवा.
त्याच सरकारचे प्रतिनिधी अशोक चव्हाण आज सांगतात की, “उद्धव ठाकरे हे दिलदार मुख्यमंत्री होते.” व्वा साहेब. ज्यांच्या कारकीर्दीत काही नेत्यांच्या व्यक्तिगत अहंकारापायी अनेकांचा विनाकारण छळ झाला ते दिलदार अन् ज्यांच्या काळात तुमच्या वागणुकीवर काहीही बंधने नाहीत ते वाईट. यालाच पक्षपाती अन् स्वार्थी राजकारण म्हणतात. आणिबाणी काळात आपलेच पिताजी स्व. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. तेव्हा आपण विद्यार्थी असाल. त्या सरकारच्या दडपशाही कारवायांची नीट माहिती घेऊन मग तुलना करून बघा.