जिल्ह्यातील २.१७ लाख शेतकर्यांचे केवायसी पूर्ण
◼️गोंदिया तालुक्यातील शेतकरी अग्रेसर
गोंदिया : जिल्ह्यातील शेतकर्यांना पीएम किसान योजना व राज्य शासनाच्या नमो महासन्मान योजनेचा लाभ दिला जात आहे. या योजनांच्या लाभासाठी शेतकर्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. दरम्यान, कृषी विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सुचना देवून शेतकर्यांना इ-केवायसी करण्याचे आवाहन केले जाते. यानुरूप जिल्ह्यात २ लाख १८ हजार ७१९ शेतकर्यांपैकी २ लाख १७ हजार ५२० शेतकर्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती असून ई-केवायसी पूर्ण करण्यामध्ये गोंदिया तालुक्यातील शेतकरी अग्रेसर आहेत.
केंद्र सरकार च्या वतीने शेतकर्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यात येत आहे. त्यात भर घालत राज्य शासनाने शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकर्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपयांचे अनुदान लाभार्थीच्या खात्यात वर्ग केले जाते. त्याच धर्तीवर राज्य शासनाकडूनही नमो महासन्मान योजनेंतर्गत ६ हजार रूपयाचे अनुदान देण्यात येते. त्यामुळे दोन्ही योजना मिळून पात्र शेतकर्यांना वर्षाकाठी १२ हजार मिळू लागले आहेत. दरम्यान, योजनेचा लाभ खर्या आणि पात्र शेतकर्यांनाच मिळावा, यासाठी योजनेत समाविष्ट असलेल्या शेतकर्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले. केवायसी करण्याची प्रक्रिया निरंतरपणे सुरू आहे. असे असले तरी जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांनी अजूनही याकडे दुर्लक्ष केले आहे.
जिल्ह्यात २ लाख १८ हजार ७१९ शेतकरी असून यात आमगाव तालुक्यात २४ हजार १२९, अर्जुनी मोरगाव २६ हजार ३०५, देवरी १७ हजार ९२२, गोंदिया ४७ हजार ७८३, गोरेगाव २४ हजार ६९४, सडक अर्जुनी २४ हजार ५४९, सालेकसा १६ हजार २७४, तिरोडा ३७ हजार ०६३ शेतकर्यांचा समावेश आहे. यापैकी २ लाख १७ हजार ५२० शेतकर्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर अद्यापही अनेक शेतकरी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शिल्लक राहिले आहेत.
◼️आचारसंहितेत अडला हप्ता…
पीएम किसान योजनेचा १८ वा व राज्य शासनाच्या नमो महासन्मान योजनेचा चौथा हप्ता निवडणूक आचारसंहितेत अडला असून आचारसंहिता संपल्यानंतर जून अखेरीस किंवा जुलै महिन्यांत दोन्ही हप्ते मिळणार आहेत. यासाठी शेतकर्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे.
◼️११९९ शेतकर्यांची ई-केवायसी प्रलंबित…
पीएम किसान योजनेचा १८ वा आणि नमो महासन्मान योजनेचा चौथा हप्ता जून किंवा जुलै महिन्यात पात्र शेतकर्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे. तत्पूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील १ हजार १९९ शेतकर्यांची ई-केवायसी करणे प्रलंबित आहे. आगामी हप्त्यापूर्वी केवायसी पूर्ण न केल्यास अशा शेतकर्यांना दोन्ही हप्त्यांच्या निधीपासून वंचित रहावे लागणार आहे.
शेतकर्यांनी केवायसी आणि आधार सीडिंग पूर्ण करावी…
केवायसी आणि आधार सीडिंग न केलेल्या शेतकर्यांची गावनिहाय यादी कृषी विभागाकडून यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार तलाठी, कृषी सहायक यांच्यामार्फत जनजागृतीसह संबंधितांना कळविण्यात आले. ज्या शेतकर्यांनी अजूनही केवायसी आणि आधार सीडिंग पूर्ण केले नसेल, त्यांनी तत्काळ ही प्रकिया पूर्ण करून घ्यावी.
– हिंदूराव चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गोंदिया
०००००००००००