चुकीच ऑपरेशन आणि हरवलेली दिशा… गॅलेक्सी हॉस्पिटल आणि डॉक्टर शैलेश पुणतांबेकर विरुद्ध माझा लढा-आशा नेगी हिरेमठ
आज अनेक हॉस्पिटल्स आणि डॉक्टरांसाठी “पेशंट” म्हणजे फक्त एक केस असतो – एक नंबर, एक फाईल… आणि सगळ्यात वाईट म्हणजे पैसे कमावण्याचं साधन. वैद्यकीय व्यवसाय हे “सेवा क्षेत्र” आहे, हे ते विसरून गेले आहेत.
2023 मध्ये मला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि मी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्याकडे उपचार सुरू केले. सुरुवातीला वाटलं की सगळं ठीक होईल, पण जे अनुभवायला मिळालं, ते आयुष्यभर विसरणं शक्य नाही.
चुकीचं ऑपरेशन, हाताचे बळी
ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांच्या चुकीमुळे माझ्या हाताची C5, C6 शीर डॅमेज झाली… यामुळे माझ्या हाताची हालचाल जवळपास दीड वर्ष बंद होती. आजही माझा हात पूर्णपणे बरा झालेला नाही. इतकं मोठं शारीरिक नुकसान आणि त्यानंतर डॉक्टरांनी एकदाही मला भेटण्याची तसदी घेतली नाही. चार-चार तास हॉस्पिटलमध्ये मी त्यांची वाट बघितली, तरीही डॉक्टर मला भेटले नाहीत. 25 टाक्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा मी ड्रेसिंगसाठी हॉस्पिटलमध्ये गेले, तेव्हा तीन-चार तास मला बसवून ठेवलं गेलं. ऑपरेशन एक तासात झालं, पण ड्रेसिंगला तीन तास लागले.
“छोटं ऑपरेशन आहे” – पण खरं काय?
कॅन्सरची स्टेज समजण्यासाठी काही आवश्यक टेस्ट्स असतात. माझं PET स्कॅन झालं, ज्यामधून कळतं की तुमचा कॅन्सर शरीरात किती पसरला आहे.
रिपोर्ट बघून डॉ. शैलेश पुणतांबेकर सतत म्हणत राहिले, “काही नाही, छोटं ऑपरेशन आहे.”
“ऑपरेशन लवकर करा, मला दोन-तीन दिवसांत फॉरेनला जायचं आहे.”
ऑपरेशननंतर मला कळलं की 27 गाठी काढण्यात आल्या होत्या.
पूर्ण ट्रीटमेंट चुकीची झाली हे जेव्हा कळालं, तेव्हा मी दुसऱ्या डॉक्टरचं ओपिनियन घेतलं. त्यांना PET स्कॅन रिपोर्ट दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्या हार्ट मध्ये अजून दोन गाठी आहेत. हा एवढा मोठा शॉक होता, की शैलेश पुणतांबेकर डॉक्टरांनी हे काहीच सांगितलं नव्हतं.
कॅन्सर” हा शब्द ऐकूनच आपण हादरतो, मग माझी मानसिक अवस्था तेव्हा कशी असेल याची कल्पना करा. पण सगळ्यात मोठा आघात म्हणजे माझी संपूर्ण ट्रीटमेंट चुकीची झाली होती.
यामुळे ट्रीटमेंटचा फ्लो बिघडला आणि त्याचे गंभीर परिणाम मला भोगावे लागले. माझा कॅन्सर अग्रेसिव्ह होता म्हणून मला वीस रेडिएशन घ्यावे लागले.. ज्यामुळे माझ्या संपूर्ण स्तनावरील आणि काखे खालची स्किन निघाली. त्यातून कंटिन्यू रक्त येत होत.. जखम काखेत असल्याकारणाने हात जर टच झाला तर, रक्ताच्या पिचकारी येत होत्या….मी काय त्रास सहन केला तो मलाच माझा माहित आहे.. . दोन महिने मी कपडे घालू शकले नाही.. आणि तब्बल आठ महिने मी शांत झोपूही शकले नाही — आणि हे सगळं कॅन्सरमुळे नव्हे, तर चुकीच्या ट्रीटमेंटमुळे.”
सेवेची नुसती नाटकं… आणि खऱ्या आयुष्याचं नुकसान
माझ्यासारख्या अनेक रुग्णांना मी भेटले आहे, जे शैलेश पुणतांबेकर डॉक्टरांकडे गेले होते.
एक महिला, ज्यांना माऊथ कॅन्सर होता – ऑपरेशनदरम्यान टाके घालताना डॉक्टरांच्या चुकीमुळे त्यांची जीभ सुद्धा शिवली गेली. या चुकीमुळे त्या महिलेला ७ वर्षं जेवता आलं नाही! असंख्य लोकांना मी भेटले ज्यांची ट्रीटमेंट शैलेश पुणतांबेकर यांनी चुकवलेली आहे…
ही काय सेवा आहे? की वैद्यकीय हिंसाचार?
रुग्ण म्हणजे माणूस, केवळ केस नाही
ही गोष्ट एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही. आज अनेक हॉस्पिटल्स गॅलेक्सी हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर, आणि इतरही – अशा अनुभवांचं केंद्र बनले आहेत. डॉक्टरांचं काम केवळ नोकरी नाही, ती एक जबाबदारी आहे, ज्यात एखाद्याचं आयुष्य पणाला लागलेलं असतं.
“अशा डॉक्टरांना बॅन करायला हवा, तरच त्यांना धडा मिळेल आणि अशा चुकीच्या उपचारांचा बंदोबस्त होईल.”
“त्या वेदना, शैलेश पुणतांबेकर यांनी दिलेली चुकीची ट्रीटमेंट, आणि ती निराशा मी पचवली… पण मनात एकच विचार होता — जे मी सहन केलं, ते इतर कुणालाच सहन करावं लागू नये. म्हणूनच मी माझ्या कॅन्सरच्या प्रवासासोबतच कॅन्सर अवेअरनेससाठी काम सुरू केलं… लोकांच्या मनातून कॅन्सरची भीती घालवण्यासाठी, आणि या आजाराविषयी योग्य माहिती पोहोचवण्यासाठी.”
(“जर कोणाला वाटत असेल की मी केवळ कोणावर आरोप करत आहे, तर कृपया गूगलवर ‘Galaxy Hospital Shailesh Puntambekar’ असं सर्च करून माझी दोन पानांची पोस्ट नक्की वाचा. ती पोस्ट एका वैयक्तिक अनुभवाची साक्ष आहे – कोणत्याही आरोपांची नव्हे, तर वास्तवाची.”)
आशा नेगी हिरेमठ
लेखिका “ब्युटी ऑफ लाईफ”
(द डायरी ऑफ कॅन्सर सर्व्हायवर)
Aasha Negi