कृषी क्षेत्रातील नवीन आव्हानांवर लक्ष देण्याची गरज
– दशरथ तांभाळे
– वनामती येथे कृषी दिन साजरा
नागपूर दि.1 जुलै : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी देशाला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करण्यासाठी हरितक्रांती घडवून कृषी क्षेत्राला नवसंजीवनी दिली तसेच रोजगार हमी योजनेतून मजुरांच्या हाताला काम देत त्याकाळातील प्रतिकूल परिस्थितीतवर मात केली होती. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेवूनच आपण दरवर्षी त्यांच्या जयंतीला कृषी दिन साजरा करतो. सध्याच्या काळात वातावरण बदल व कृषी उत्पादनांची मूल्यसाखळी विकसित करणे या कृषी क्षेत्रातील नवीन आव्हानांवर लक्ष देण्याची गरज असून त्यासाठी वसंतराव नाईक यांचेपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन कृषी आयुक्तालय पुणे येथील आत्माचे संचालक दशरथ तांभाळे यांनी आज केले.
वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था (वनामती) येथे आज माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी श्री. दशरथ तांभाळे अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. वनामतीच्या संचालक डॉ. मित्ताली सेठी, राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व जमीन वापर नियोजन विभागाचे संचालक डॉ. नितिन पाटील, हैद्राबाद येथील कृषी विस्तार विभाग मॅनेज चे उपसंचालक महंतेश शिरूर, सिम्बॉइसीसचे संचालक डॉ. अल्टेकर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सुनिल रोकडे, वैज्ञानिक डॉ. अप्तुरकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
पर्यावरण बदलावर मात करण्यासाठी शासनातर्फे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व सेंद्रीय नैसर्गिक शेती कार्यक्रम यासारख्या विविध पर्यावरण पूरक योजना राबविण्यात येत आहेत. शासनाचे हे प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण आवश्यक असून यासाठी प्रशिक्षण संस्था देखील बळकट करण्याच्या गरज असल्याचे दशरथ तांभाळे यांनी पुढे सांगितले.वनामतीच्या संचालीका मित्ताली सेठी यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावीक केले. वनामतीतर्फे सुरू असलेले प्रशिक्षण व भविष्यातील वनामतीच्या योजना याबाबत त्यांनी माहिती दिली.
याप्रसंगी वनामतीच्या vanamati.in या संकेतस्थळाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच ‘अ जर्नी टुवर्ड्स एक्सटेंशन रिवाल्युशन’ या कॉफीटेबल बुकचे व ‘विस्तार वसंत’ या यशोगाथा विशेषांकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वनामतीतर्फे रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ‘बदलत्या हवामानामुळे मुख्य पिकांचे उत्पादकतेवर होणारे परिणाम व त्यावर उपाययोजना व हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञान’ तसेच कृषी विस्तार तंत्रज्ञान व कृषी उत्पादन विक्री व्यवस्थेमध्ये शेतकरी उत्पादन कंपन्यांची उदयोन्मुख भूमिका’ या विषयांवर चर्चासत्र झाले.
कार्यक्रमाचे संचालन सहायक संचालक डॉ. राजश्री पवार , वरिष्ठ प्रशिक्षण समन्वयक मिलींद तारे व प्रशिक्षण समन्वयक सीमा मुंडले यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपसंचालक सुबोध मोहरील यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला वनामती सिपीटीपी च्या संचालक सुवर्णा पांडे, अपर संचालक मारोजी चपळे, उपसंचालक निखील ठोंबरे व मंजूषा राऊत, तसेच डॉ. गणेश बेहरे, डॉ. रोकडे, डॉ. डी.टी.मेश्राम, डॉ. नरेश मेश्राम, आत्मा संचालक (नागपूर) डॉ. अर्चना कडू, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रफुल बांडेबुच्चे, जयसिंग थोरवे, सतिश गिरसावळे, महेंद्र टेकाडे, प्रताप मांगळूकर उपस्थित होते.