कंटेनरच्या धडकेत वडिलांचा मृत्यू : मुलगा गंभीर
◼️राष्ट्रीय महामार्ग ६ वरील घटना
गोंदिया : अज्ञात कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार वडीलांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना आज, शुक्रवार (दि.१७) सकाळच्या सुमारास देवरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव (डेपो) गावशिवारात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर घडली. चंद्रशेखर वामनराव साखरे (वय ४५ रा. कोहमारा ) असे मृत वडीलांचे तर मासूम चंद्रशेखर साखरे (वय १५) असे जखमी मुलाचे नाव आहे.
सविस्तर असे की, मृत चंद्रशेखर हे मुलासह आपल्या दुचाकीने (मोपेड) कोहमारावरून देवरीकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरगाव / डेपो गाव परिसरात नागपूरकडून रायपूर कडे जात असलेल्या अज्ञात कंटेनरच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवून त्यांच्या मोपेडला मागून धडक दिली. यात चंद्रशेखर हे कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेला त्यांचा 15 वर्षीय मुलगा मासूम हा गंभीर जखमी झाला. दरम्यान, काहींनी घटनेची माहिती देवरी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी मुलाला उपचारासाठी देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तर घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. या घटनेची नोंद देवरी पोलिसांनी केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
०००००००००००००