उद्धव ठाकरे पुत्र प्रेमात धृतराष्ट्र झाले! -चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका…-यवतमाळ जिल्ह्यात मोदी@९ अभियान…-देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद चोरले
यवतमाळ – देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरे यांची चोरले. पुत्रप्रेमात ते धुतराष्ट्राप्रमाणे आंधळे झाल्याने त्यांचे ५० आमदार सोडून गेले हे देखील त्यांना माहिती नव्हते. येत्या काळात त्यांच्या पक्षाच्या मंचावर केवळ चारच चेहरे दिसतील. अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकाला ९ वर्षे पूर्ण झाली. सरकारच्या कामाची माहिती जनमानसांत पोहचविण्यासाठी भाजपाकडून मोदी@९ हे अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने यवतमाळच्या बाभुळगाव येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, त्या सभेत श्री बावनकुळे मार्गदर्शन करीत होते. यावेळी आ. मदन येरावार, यवतमाळ भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भूतडा, यवतमाळ विधानसभा निवडणूक प्रमुख बाळासाहेब शिंदे, जिल्हा संघटन सरचिटणीस राजू पडगिलवार, डॉ. आशिषराव देशमुख यांच्यासह सर्व प्रमुख भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री बावनकुळे म्हणाले, भाजपाला दिलेल्या एका मतामुळे देशाच्या विकासात जनतेने हातभार लावला आहे. शेतकरी, महिला व सर्वच घटकातील नागरिाकंत सन्मानाची भावना वाढीस लागली आहे. मोदींच्या नेतृत्त्वात जगभरात भारताची प्रतिमा उंचावली. २०३५ पर्यत मोदींच्या नेतृत्त्वात भारत आत्मनिर्भर होईल.
• महाराष्ट्रात ध्रुवीकरण अशक्य
महाराष्ट्रात ध्रुवीकरण करून या महाराष्ट्रात निवडून येता येईल हे शक्य होणार नाही, आमच्या जवळ मोदी सरकार व शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या कामाची शिदोरी आहे, असे ते म्हणाले
सरकार सर्वसामान्य लोकांच्या विकासाचे साधन
कॉंग्रेसच्या काळात १०० रुपयांपैकी १५ रुपयेच जनतेपर्यंत पोहचत होते, मात्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून पूर्ण १०० रुपये जनतेपर्यंत पोहचत आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील देशाची सत्ता आणि सरकार सर्वसामान्य लोकांच्या विकासाचे साधन झाले आहे.
मविआ मध्ये मुख्यमंत्री पदाचे अनेक उमेदवार
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला उद्धव ठाकरे यांचे नेतृत्त्व मान्य नसल्याने महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला तडा पडला आहे. शरद पवारांनी देखील त्यांच्या आत्मचरित्रातून ठाकरेंच्या कामगिरीवर प्रश्न केला. महाविकास आघाडीमध्ये ८ लोक मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ३-३ तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे, असेही श्री बावनकुळे म्हणाले.
मान्यवरांच्या भेटी अन् दिवसभर संवाद
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या एक दिवसीय यवतमाळ दौऱ्याची सुरुवात त्यांनी राजमाता जिजाऊ चौकातील राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून केली. यावेळी लोहारा-यवतमाळ मार्गाच्या भूमिपूजन सोहळ्यात सहभाग नोंदविला. दुपारी कामठवाडा येथे जिल्हाभरातील भाजपा कार्यकर्त्यांशी टिफीन बैठकीतून संवाद साधला. दाऊदी बोहरा समाजाचे शेख अजीज शाकीर यांची भेट घेतली. दी यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या मुख्यालयाला भेट दिली व कामकाजाची माहिती घेतली. शहरातील प्रभावशाली व्यक्ती, संस्था व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. यानंतर रात्री त्यांनी शहरातील व्यापारी व उद्योजकांशी संवाद साधला.