‘परीक्षा पे चर्चा ‘ कार्यक्रमात नागपूर येथून सहभागी झाले उपमुख्यमंत्री
– देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
नागपूर दि. २७ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दरवर्षी बोर्डाच्या परीक्षा सुरू होत असताना देशभरातील विद्यार्थ्यांशी संपर्क साधतात. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी महाल परिसरातील सुप्रसिद्ध न्यू इंग्लिश हायस्कूल या शाळेतून या कार्यक्रमात सहभाग घेतला. प्रधानमंत्री यांचे प्रेरणादायी भाषण आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.
दहावी, बारावी व बोर्डाच्या अन्य परीक्षा सुरू होत असताना देशभरातील विद्यार्थ्यांच्या मनातील तणाव कमी करण्यासाठी दरवर्षी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी थेट विद्यार्थ्यांशी संपर्क साधतात. देशभरातल्या कानाकोपऱ्यातील शाळांमधून हा प्रातिनिधिक संवाद असतो. यामध्ये आज प्रधानमंत्री यांनी देशाच्या कानाकोपऱ्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना पडणाऱ्या अनेक प्रश्नांना थेट त्यांच्या भाषेत त्यांना समजेल अशा उदाहरणांसह संवाद साधला.
नागपूरमधील महाल परिसरातील 137 वर्षांपूर्वीच्या न्यू इंग्लिश हायस्कूल या शाळेमध्ये हा संवाद मोठ्या डिस्प्ले स्क्रीनवर शाळेच्या विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. या शाळेचा सहभाग नव्हता. मात्र विद्यार्थ्यांचा उत्साह प्रचंड होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह यावेळी आमदार प्रवीण दटके,विकास कुंभारे, यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रहाटे, काँग्रेस नगर येथील न्यू इंग्लिश हायस्कूलचे प्राचार्य श्री. महाजन सर व शाळेचे ट्रस्टी उपस्थित होते. प्रधानमंत्रीच्या भाषणाच्या पूर्ण काळात उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. कार्यक्रम संपल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना अभिवादन केल्यानंतर एकच जल्लोष करत त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. देवर्षी नगरकर यांनी केले