सोलापूर जिल्ह्यातील दूध भेसळीप्रकरणी कठोर कारवाई करणार
– अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ
मुंबई, दि. ११ : सोलापूर जिल्ह्यातील भोसे येथील दूध भेसळीप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत सांगितले.
यासंदर्भात विधानसभा सदस्य अभिजीत पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवळ म्हणाले की, “कृत्रिम दूध तयार करून त्याचा पुरवठा करणे मानवी आरोग्यास घातक असून, या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. तपास पूर्ण होताच दोषींवर तातडीने कठोर कारवाई केली जाईल. तसेच या प्रकरणात दोषींचे बँक खाते सील केले जाईल यामधील आरोंपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास ‘मोक्का‘ (MCOCA) अंतर्गत कारवाईचा सुद्धा विचार केला जाईल, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही आणि भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी कठोर उपाययोजना केल्या जातील, असेही श्री झिरवाळ यांनी सांगितले.