सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून तडीपार
◼️रामनगर पोलिसांची कारवाई
गोंदिया,- गोंदिया शहरातील रामनगर परिसरातील सराईत गुन्हेगारास उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पर्वणी पाटील यांनी गोंदिया जिल्ह्यातून 2 महिन्याच्या कालावधी करीता हद्दपार केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलिसांनी केली. शुभम सुभाष शामकुवर (वय 20 रा. कुडवा) असे हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस ठाणे रामनगर परिसरातील सराईत गुन्हेगार शुभम शामकुवर याचेविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात शिवीगाळ करून मारहाण करणे, चोरी, जबरी चोरी, शिवीगाळ धमकी देणे, गैर कायद्याची मंडळी जमवून इच्छापूर्वक गंभीर दुखापत करणे, गृह अतिक्रमण करणे, अशाप्रकारे 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान त्याच्या विरोधात वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा त्याचे चारित्र्यात आणि सवयीत कसलीही सुधारणा झालेली नाही. सदर गुन्हेगार हा सवयीचा मंगरूर व धाडसी प्रवृत्तीचा असल्याने परिसरातील लोकांच्या मनात दहशत निर्माण होवून त्याच्या कृतीमुळे परीसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याने त्याचेविरूद्ध रामनगर चे पोलीस निरीक्षक यांनी गोंदिया, भंडारा, चंद्रपूर , नागपूर, गडचिरोली, जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (1),(अ),(ब) अन्वये हद्दपार प्रस्ताव क्रं. 4/2023 प्रमाणे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया यांचेकडे सादर केले होते.
यावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या चौकशी करुन केलेल्या शिफारशीनुसार उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पर्वणी पाटील, यांनी सदर सराईत गुन्हेगारास दोन महिन्याच्या कालावधीकरीता गोंदिया, भंडारा, चंद्रपूर , नागपूर, गडचिरोली, जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात येत असल्याबाबतचे आदेश दिले आहे.
०००००००