विजुभाऊ, आता बस्स्स करा !
आमदार संदीप जोशींसह नागपुरातील कलावंतांचे विजय वडेट्टीवारांना आव्हान आणि आवाहन
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणावरून मंगेशकर कुटुंबीयांवर आरोप करताना पातळी सोडली आहे. मंगेशकर कुटुंबीयांशी कुठल्याही बाबतीत बरोबरी न करू शकणाऱ्या वडेट्टीवारांनी आम्ही केलेले आव्हान स्वीकारावे आणि प्रश्नांची उत्तरे लोकांसमोर द्यावीत नाहीतर आम्ही केलेल्या आवाहनाला साद देत मंगेशकर कुटुंबीयांवर करीत असलेले आरोप थांबवावेत, असे आवाहन विधानपरिषदेतील नवनिर्वाचित आमदार संदीप जोशी यांच्यासह नागपुरातील प्रख्यात कलावंतांनी केले आहे.
ज्येष्ठ गायक अमित खोब्रागडे, नागपुरातील कलासाधक प्रफुल्ल माटेगांवकर तसेच ज्येष्ठ तबलावादक सचिन ढोमणे यांचा यात समावेश आहे. नुकतेच प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात आमदार जोशी आणि सर्व कलावंतांनी विजय वडेट्टीवार यांना मंगेशकर कुटुंबीयांची माहिती देत त्यांच्यासमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. विजय वडेट्टीवार यांच्याशी आपले वाईट संबंध नाहीत किंवा मंगेशकर कुटुंबीयांशी आमचे हितसंबंध नाहीत. मात्र वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपाने देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनात चीड निर्माण केली आहे. कलाप्रेमी, कला उपासक दुखावले गेले आहेत. या वाक्याचा निषेध करीत वडेट्टीवारांनी जाहीर माफी मागावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
पत्रकात म्हटल्याप्रमाणे, दिवंगत लता मंगेशकर ह्या ‘भारतरत्न’ आहेत. पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण अशा देशातील व राज्यातील सर्वोच्च पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. मंगेशकर कुटुंबीयातील आशाताई भोसले, पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषाताई मंगेशकर हे सदस्यही सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित आहेत. वडेट्टीवार यांच्या परिवारात कोणाला तरी या दर्जाचा एखादा अवॉर्ड मिळाला असेल तर तो त्यांनी जाहीर करावा, असे आवाहनही आमदार संदीप जोशी यांनी केले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लता मंगेशकर यांना आवडणारे नेतृत्व होते. मंगेशकर कुटुंबीयांकडे असलेली संपत्ती ही त्यांनी त्यांच्या कलासाधनेतून कमावलेली आहे. त्यांनी आपल्या कमावलेल्या नावावर पुण्यात अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज रुग्णालय उभारण्यासाठी देणगी गोळा केल्या. सदर रुग्णालय ट्रस्ट मार्फत संचालित आहेत. रुग्णालयाच्या माध्यमातून ट्रस्टची जी कमाई होते त्यात मंगेशकर कुटुंबीय कुठल्याही पद्धतीने लाभार्थी नाहीत. जमा होत असलेली संपूर्ण रक्कम ट्रस्ट रुग्णालयाकरिताच वापरते, असेही पत्रकात म्हटले आहे.
या पत्रकाच्या माध्यमातून आमदार संदीप जोशी आणि कलावंतांनी वडेट्टीवार यांना मंगेशकर कुटुंबीयांनी देशासाठी काय काय केले, हे सुद्धा सांगितले. 1962, 1965 च्या युद्धात त्यांनी अनेक कार्यक्रम करुन लाखो रुपयांच्या देणग्या गोळा केल्या ज्या त्यांनी युद्धात शहीद झालेल्या, जखमी झालेल्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी सैन्यदलाकडे सोपविल्या. गोवा मुक्ती संग्रामात त्यांचे योगदान मोठे होते. 1983 मध्ये भारताने विपरीत परिस्थितीत क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला. त्या भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी खुद्द लता मंगेशकर यांनी निधी उभारला, हा इतिहास आहे. दादरा नगर हवेलीच्या मुक्तीमध्ये लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी संगीताच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावली होती. कोरोना महामारीच्या काळात लता मंगेशकर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला 25 लाख रुपये दिले. पुलवामा येथे लष्कराच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी स्वत: लता मंगेशकर यांनी आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून एक कोटी रुपये सैन्याला दान केले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशात ज्या ज्या वेळी संकट आले त्या त्या वेळी याच लतादीदींच्या आवाजाने आणि मंगेशकर कुटुंबाच्या संग़ीत साधनेने प्रत्येक भारतीयांमध्ये स्फुरण चढविले, देशप्रेम जागृत केल्याचे आमदार जोशी यांनी म्हटले आहे. असे असतानाही ‘मंगेशकर कुटुंबीय ही लुटारुंची टोळी आहे. त्यांच्यापैकी कुणी कधी दान केल्याचे पाहिले आहे का, असे वडेट्टीवार जर म्हणत असेल तर वडेट्टीवारांच्या परिवाराने या लुटारुंच्या टोळीपेक्षा केलेले दान जास्त असेल तर जनतेसमोर आणावे, आम्ही जाहीर माफी मागू असे थेट आव्हानच केले आहे.
वडेट्टीवार यांच्या मंगेशकर कुटुंबीयांच्या भूमिकेसंदर्भाने आमदार संदीप जोशी आणि कलावंतांनी त्यांना काही प्रश्नही विचारली आहेत. ते म्हणतात, ‘दिदींचा आवाज हृदयाला भिडणारा, राष्ट्रभक्तीने ओतप्रोत, असा होता. त्यांचे संघर्षमय जीवन भविष्यात अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील’, असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी का म्हटले असेल? 27 जानेवारी 1963 रोजी कवी प्रदीप यांनी लिहिलेले ‘ए मेरे वतन के लोगो…’ हे गाणं लतादिदींनी दिल्लीच्या नॅशनल स्टेडियममध्ये पहिल्यांदा सादर केले. त्यावेळी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे अश्रू अनावर झाल्याचा इतिहास आहे. त्यावेळी पंडितजींच्या डोळ्यात काही काडीकचरा गेला म्हणून अश्रू आले का, असा काही संदर्भ मिळतो का, हे वडेट्टीवारांनी तातडीने शोधावे, असे आवाहनही केले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासाठी कोणत्या सरकारच्या काळात जागा देण्यात आली, याचाही शोध त्यांनी घ्यावा. दीनानाथ रुग्णालयात दहा लाख डिपॉझिट भरायला सांग़णारे डॉक्टर मंगेशकर कुटुंबीयांचे नातेवाईक आहेत का, याचा वडेट्टीवारांनी शोध घ्यावा. देशातील अनेक प्रकल्प महापुरुषांच्या नावावर आहेत. त्याच्या कामातही भ्रष्टाचार होतो. मग त्यात त्या महापुरुषांच्या कुटुंबीयांना जबाबदार धरायचे का? विदर्भातीलच गोसे खुर्द नावाने ओळखला जाणाऱ्या प्रकल्पाचे नाव माजी पंतप्रधान इंदिर गांधी यांच्या नावाने अर्थात ‘इंदिरासागर’ असे आहे. या धरणाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचार आपल्यापेक्षा अधिक कोणाला माहिती असेल? देशातील गाजलेल्या सिंचन घोटाळ्यांपैकी तो एक आहे. मग या घोटाळ्यात संपूर्ण गांधी कुटुंबीयांना दोषी धरायचे का? असे अनेक प्रश्न वडेट्टीवारांसमोर त्यांनी उपस्थित केले आहे.
हे प्रश्न उपस्थित करतानाच सोनिया गांधी यांना लतादिदींबाबत खरी परिस्थिती सांगून त्यांनी केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावावे, लतादिदींच्या आवाजातील गाणे ऐकणाऱ्या श्रोत्यांना दम द्यावा, पंडितजींच्या डोळ्यात अश्रू आल्याचा इतिहास तातडीने बदलावा, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मंगेशकर कुटुंबीयांचे किती नातेवाईक आहेत, हे शोधण्यासाठी एक कमिटी नेमण्याची मागणी करावी आणि आपला व्यवसाय काय आणि कुठे आहे आणि आपण आतापर्यंत किती देणग्या दिल्या आहेत, हे जाहीर करण्याचे आव्हान आमदार संदीप जोशी आणि कलावंतांनी दिले आहे.
विजय वडेट्टीवार हे मंगेशकर कुटुंबीयांवर करत असलेले आरोप नैराश्यातून, प्रक्षोभक वक्तव्याने स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याच्या कुरघोडीतून आणि पक्षात डळमळीत असलेले पद सावरण्याच्या हेतूने करीत आहेत. हे करत असताना किमान देशाचा, राज्याचा इतिहास त्यांनी वाचावा. स्वत:कडेही बघावे. इतरांकडे बोट दाखविताना चार बोटे आपल्याकडे असतात हे त्यांनी विसरु नये असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी ते करीत असलेल्या खालच्या पातळीवरील टीका त्वरित थांबवाव्या, असे आवाहन आमदार संदीप जोशी, ज्येष्ठ गायक अमित खोब्रागडे, नागपुरातील कलासाधक प्रफुल्ल माटेगांवकर तसेच ज्येष्ठ तबल वादक सचिन ढोमणे यांनी केले आहे.