– महानगरांना अधिक धोका
नागपूर, ३ फेब्रुवारी
कर्करोगामुळे होणारे जगातील सर्वाधिक मृत्यू हे फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होत असल्याचे आढळून आले आहे. फुफ्फुसाचा कर्करोग हा ब्रेस्ट आणि प्रोस्टेट कर्करोगानंतरचा तिसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही हा कर्करोग वाढत असून वायू प्रदूषण यास मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत आहे. नाकातून प्रदूषित हवा शरीरात प्रवेश करीत असल्याने श्वसनमार्गाच्या वरच्या टप्प्यातील अवयवांमध्ये कर्करोगाचा धोका अधिक असतो, अशी माहिती नागपूर येथील क्रिम्स हॉस्पिटल्सचे वरिष्ठ श्वसनरोग तज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी दिली.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) वायुप्रदूषणामुळे दरवर्षी १८ लाख लोक फुफ्फुसाचा कर्करोग होऊन मरण पावतात. दिवसेंदिवस प्रदूषणाची पातळी वाढत असून फुफ्फुसाशी संबंधित आजरांसह कर्करोगाचे प्रमाण देखील वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या कर्करोगावर संशोधन करणाऱ्या संघटनेने तंबाखू, लठ्ठपणा, मद्यपानासह वायू प्रदूषण हे देखील कर्करोगाच्या वाढीस प्रमुख घटक असल्याचे नमूद केले आहे. 2050 मध्ये सर्व प्रकारच्या कर्करोगाच्या नवीन रुग्णांची संख्या 35 दशलक्षांपेक्षा जास्त होईल असे त्यांनी अभ्यासातून मांडले आहे. ही आकडेवारी 2022 मधील आकडेवारीपेक्षा 77 टक्के जास्त असून धोक्याची घंटा आहे. वायू प्रदूषणामुळे लोकांना फुफ्फुसांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. पॉलीसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स, कार्बन डायऑकसाईड, नायट्रोजन डायऑकसाईड आणि जड धातूंसारख्या कार्सिनोजेन्ससह विशिष्ट वायु प्रदूषकांच्या दीर्घकाळापर्यंत संपर्कामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो, असेही डॉ. अरबट यांनी नमूद केले. यासह हवेतील १० मायक्रोमिटरचे धूलिकण फुफ्फुसांमध्ये खोलवर प्रवेश करतात. अशा धूलिकणांशी दीर्घकाळ संपर्क व वाहन प्रदूषणातून उत्सर्जित होणारे संयुगे देखील फुफ्फुसाच्या कर्करोगास कारणीभूत ठरतात, असेही ते म्हणाले. ओझोनमुळे पृथ्वीतलावर होणारे वायूप्रदूषण हा देखील फुफ्फुसाच्या वाढत्या कर्करोगामागील महत्वाचे कारण बनत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने वायू प्रदूषणाला कार्सिनोजेन म्हणून वर्गीकृत केले आहे म्हणजे ते मानवांमध्ये कर्करोगास कारणीभूत ठरू शकते. महामार्गाजवळील शहरे, झपाट्याने विकसित होणारी महानगरे व त्यामुळे होणारे प्रदूषण आणि कारखान्यांसारख्या प्रदूषित वातावरणात काम करणाऱ्या लोकांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका अधिक संभवतो. वायू प्रदूषण ही सार्वजनिक आरोग्याची एक महत्त्वाची समस्या असली तरी, फुफ्फुसाचा कर्करोग आणि इतर श्वसनाच्या आजारांच्या विकासास हातभार लावणारा हा एकमेव घटक नाही. तंबाखूचे दीर्घकालीन धूम्रपान, रेडॉन वायूचा (जीवाष्म इंधन आणि कोळसा ज्वलनातून उत्सर्जित होणारा वायू) संपर्क आणि अनुवांशिकता हे घटक देखील मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात. परंतु, हवेतील प्रदूषित सुक्ष्म कण फुफ्फुसातील ट्युमरच्या विकासास प्रोत्साहन देतात. त्यामुळे वायू प्रदूषण रोखणे आणि त्यापासून आपला बचाव करणे काळाची गरज बनत असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.
उपाय :
प्रदूषणास आळा :
पालापाचोळा किंवा प्लास्टिक आणि आवारातील कचरा न जाळता त्याचे विघटन करावे जेणेकरून प्रदूषणास आळा बसेल.
सार्वजनिक वाहतुकीचा, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा जेणेकरून प्रदूषणात घट होईल.
वृक्ष लागवड करून प्राणवायूचे प्रमाण वाढवणे हा देखील प्रदूषणात घट आणण्याचा प्रभावी उपाय आहे.
आरोग्य चाचण्या :
महिना-दोन महिन्यापासून खोकला, श्वास घेण्यास त्रास वा दम लागत असल्यास त्वरित पल्मनरी फंक्शन टेस्ट, एक्स-रे, इ-बस, ब्रोन्कोस्कोपीसारख्या श्वसनारोग्यासंबंधित चाचण्या वेळीच करून घ्यायला हव्या.