वसुंधरेला हिरवीगार करण्यासाठी ‘वृक्षधारा’ची धडपड
◼️ आतापर्यंत 9 हजारांहून अधिक रोपांची लागवड
गोंदिया : वसुंधरेवरील म्हणजेच पृथ्वीवरील वने, माती, हवा, पाणी व जैवविविधता यांसह सर्व नैसर्गिक संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करणे, तसेच पुढील पिढ्यांसाठी त्यांचे संवर्धन करणे, मानवनिर्मित कृतीमुळे पृथ्वीवर होणारे प्रदूषण व पर्यावरणाची नासाडी रोखणे किंवा त्याला आळा घालणे. याविषयी जनजागृती होण्याची गरज आहे. दरम्यान, पर्यावरणाचा समतोल राखता यावा यासाठी गोंदियातील वृक्षधारा फाऊंडेशनच्या युवकांची धडपड सुरू असून फाऊंडेशनच्या माध्यमातून युवक दररोज वेगवेगळ्या भागात रोपे लावून वसूंधरेला पूर्वीसारखी हिरवीगार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात आतापर्यंत ९ हजारांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली असून या वृक्षांचे संवर्धन केले जात आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार, गेल्या १० वर्षात पृथ्वीच्या तापमानात जेवढी वाढ झाली आहे, त्यापैकी ८५ टक्के तापमानवाढ एकट्या कार्बन डायऑक्साइडमुळे झाली आहे. खनिज इंधने ही मानवनिर्मित कार्बन डायऑक्साइडच्या उत्सर्जनाचे मोठे स्रोत आहेत. आपण ज्या-ज्या वेळी वाहनांचा व ऊर्जेचा अतिरेकी वापर करत असतो. त्या-त्या वेळी खनिज इंधने जाळून कार्बन डायऑक्साइडची निर्मिती करत आपण जागतिक तापमानवाढीला हातभार लावत असतो. आपल्या इतर छोट्यामोठ्या कृतीतूनही पर्यावरणास घातक ठरणाऱ्या वायूंची निर्मिती होत असते. दरम्यान, झाडे आपल्याला केवळ ऑक्सिजन देत नाहीत तर आपल्याला फुले, फळे, औषधे आणि लाकूड देखील देतात. तेव्हा वृक्षारोपण करून रोपट्यांना संवर्धन करण्याचे कार्य गोंदियातील वृक्षधारा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे. तर या सामाजिक कार्यात नागरिकांचाही सहभाग वाढावा स्वतः रोपटे लावण्यासाठी तयार व्हावेत आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनाही या उदात्त कार्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
या फाऊंडेशनची सुरुवात २०१६ मध्ये नागपुरातून करण्यात आली. मात्र, २०२० यावर्षी कोरोनासारख्या गंभीर आजाराच्या प्रादुर्भावामुळे वृक्षारोपणाचे काम पूर्णपणे प्रभावित झाले. त्यातच कोरोनामुळे नोकरी गमावलेले तरुण या फाउंडेशनमध्ये सामील झाले आहेत. या फाउंडेशनच्या सहा शाखा असून या फाउंडेशनच्या माध्यमातून दररोज २०० हून अधिक तरुण रोपटे लावण्याचे काम करत आहेत. इतकंच नाही तर प्रत्येक रविवारी फाऊंडेशनचे सदस्य रोपांची काळजी घेत असून लावलेली रोपटी जिवंत आहेत की, नाही याची तपासणी करतात. विशेष म्हणजे, आतापर्यंत फाऊंडेशन तर्फे ९ हजारांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली असून त्यांचे संवर्धन केले जात आहे. या कार्यात वनविभाग व ग्रामपंचायती मार्फतही सहकार्य मिळत असल्याचे फाऊंडेशनतर्फे सांगण्यात आले आहे.
◼️तरुणांनी पुढे येण्याची गरज …
आज वाढती लोकसंख्या आणि विकासाच्या नावाखाली वर्षानुवर्षे जुनी झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे बिघडला आहे. तेव्हा जास्तीत जास्त झाडे लावण्याचा वृक्षधारा फाऊंडेशनचा प्रयत्न आहे. जेणेकरून आपली जमीन पूर्वीसारखी हिरवीगार दिसेल. तरुणांनी या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा. जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना स्वच्छ व स्वच्छ वातावरण मिळू शकेल आणि नागरिकांमध्येही जनजागृती होऊ शकेल.
– नितेशकुमार बरेवार, सह-संस्थापक, वृक्षधारा फाऊंडेशन