लालाजी कायम स्मरणात राहतील!
तब्बल तीन दशके अकोल्यातील नागरिकांच्या मनावर राज्य करणारे भाजपाचे संवेदनशील लोकप्रतिनिधी आमदार गोवर्धनजी शर्मा यांच्या जाण्याने लोकांच्या प्रश्नाशी इमान राखणारा आणि हिंदुत्वाचा विचार आयुष्यभर जपणारा एक प्रखर राष्ट्रवादी लोकनेता आपण गमावला आहे.
गोवर्धनजी यांची ओळख ‘लालाजी‘ या आपुलकीच्या हाकेने व्हायची. त्यांना कोणीही नाव घेऊन बोलावत नव्हते. सर्वजण आदराने, आपुलकीने ‘ लालाजी‘ म्हणायचे. त्यांना कधीच चारचाकीचा मोह झाला नाही. अकोल्यातील कुठल्याही कार्यकर्त्याच्या दुचाकीवर मागे बसून त्यांची शहरात भ्रमंती असायची. लग्न, बारसे, तेरवी अशा सुख – दुःखाच्या प्रसंगात घरातील कार्य समजून ते सहभागी व्हायचे. अहंकार त्यांना कधीच शिवला नाही. कार्यकर्ता हेच माझे कुटुंब आहे, हा विचार प्रत्यक्ष आचरणात आणत असल्याने लालाजीचे नेतृत्व जातीधर्माच्या पलीकडे केव्हाच गेले होते.
ते प्रखर हिंदुत्ववादी होते. राम जन्मभूमी आंदोलनात त्यांचे खूप मोठे योगदान होते. या विषयाचा निवाडा झाला, तो दिवस त्यांच्या आयुष्यात परमोच्च आनंद देणारा होता. त्यांच्या जाण्याने मी एका ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकलो आहे. लालाजीच्या लोकग्रणी कार्यकर्तेपणाची उणीव पक्षाला आणि समाजाला नेहमीच जाणवत राहील.
दोन महिन्यापूर्वी, मी त्यांना अकोला येथील त्यांच्या घरी भेटायला गेलो. त्यावेळी पक्षकार्यास झोकून देईन, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला होता…ते आज अचानक आपल्यातून निघून जातील हा विचारही त्यावेळी मनाला शिवला नव्हता. ते आपल्या प्रेमळ स्वभावाने मृत्यूलाही माघारी परतवतील असे वाटले होते. पण नियतीपुढे आपण सारेच हतप्रभ असतो.
माझ्या मनपटलावर त्यांची भेट ठसली आहे. त्यांनी सांगितलेल्या आठवणी आता माझी शिदोरी आहे.
लालाजी नेहमी स्मरणात राहतील.
माझी विनम्र श्रद्धांजली..
• चंद्रशेखर बावनकुळे
प्रदेशाध्यक्ष, भाजपा, महाराष्ट्र.