राजकुमार बडोले झाले तिसऱ्यांदा आमदार
◾️विजयी मिरवणूक काढून मानले मतदारांचे आभार
गोंदिया : अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार इंजि. राजकुमार बडोले यांनी ८२ हजार ५०६ मत घेत त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार दिलीप बनसोड यांचा १६ हजार ४१५ मतांनी पराभव करून विजय मिळवून तिसऱ्यांदा आमदार होण्याचा मान मिळवला. दरम्यान, त्यांनी शहरातून विजयी मिरवणूक काढून मतदारांचे आभार व्यक्त केले.
अर्जुनी विधानसभेच्या मतमोजणीला आज (ता. २३) कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव येथील मैदानात १४ टेबलवर एकूण २३ फेऱ्यांमध्ये सुरुवात झाली. त्यात महायुतीचे उमेदवार राजकुमार बंडोले यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली. मतमोजणीत राजकुमार बडोले यांना ८२ हजार ५०६ मते, तर महाविकास आघाडीचे दिलीप बनसोड यांना ६६ हजार ९१ मते, प्रहार जनशक्ती संघटनेचे सुगत चंद्रिकापुरे यांना १५ हजार ४२८ मते, त्यातच काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार अजय लांजेवार यांना ४ हजार ७४४ मते, तर वंचित. बहुजन आघाडीचे दिनेश पंचभाई यांना ५ हजार ४५३ मते मिळाली. विशेष म्हणजे, या मतदारसंघात एकूण १ लाख ८३ हजार २४२ मतांची मोजणी झाली. ज्यामध्ये उर्वरित उमेदवारांना त्यांची सुरक्षा ठेवही वाचवता आली नाही. दरम्यान, विजयाचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर नवनिर्वाचित आमदार इंजि. राजकुमार बडोले यांनी सर्वप्रथम तहसील कार्यालयाजवळील शहीद गोवारी स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर भव्य विजयी रॅलीला सुरुवात झाली. यावेळी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गावरून विजयी मिरवणूक काढण्यात आली. ज्यामध्ये राजकुमार बडोले यांनी सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे तथा सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार व्यक्त केले.
०००००००