रस्त्याचा विकास शेतकर्यांसाठी भकास !
◼️ गोरेगाव-ठाणा रस्त्यावरील पुलच झाला गायब
◼️संबंधित विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
गोंदिया : शासनाकडून अनेक राज्य मार्गांना महामार्गाचा दर्जा बहाल करून रस्ते विकास करण्यात येत आहे. त्यातच ग्रामीण भागातील रस्ते देखील कात टाकत आहेत. मात्र, संबंधित विभागातील काही अधिकार्यांचा कामचुकार व संबंधित कंत्राटदारच्या कामचलाऊ वृत्तीमुळे रस्त्यांचा हा विकास नागरिकांसाठी भकास ठरू पाहत आहे. जिल्ह्यातील गोरेगाव-ठाणा मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असून या कामात या मार्गावरील एमसीपी शाळेजवळील जुना पुलच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला असून कंत्राटदाराने पैसे वाचविण्याच्या नादात येथील पुलच बुजवले आहे. त्यामुळे नाल्याच्या पाण्याचा प्रवाह अवरूद्ध झाला असून दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचे पाणी रस्त्याच्या एका बाजूला साचले आहे. तर सदर पाण्याची वाट मोकळी न केल्यास येत्या पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह अवरूद्ध होऊन हा पाणी परिसरातील जवळपास 20 ते 25 एकर शेतात शिरण्याची भिती येथील शेतकर्यांकडून व्यक्त केली जात आहे.
देशात विकासाची अनेक कामे केली जात असतानाच दळणवळणाच्या दृष्टीने सर्वत्र रस्ते विकासाची कामे केली जात आहे. विशेष म्हणजे, शासनाकडून अनेक राज्य मार्गांना राष्ट्रीय महामार्ग तर जिल्हा मार्गांना राज्यमार्गाचा दर्जा बहाल करण्यात आलेला आहे. यानुसार मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सर्वत्र अरूंद रस्त्यांचे रुंदीकरण करून नव्याने रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध योजनांच्या माध्यमातून जिल्हा परिषदांच्या रस्त्यांचेही रुंदीकरण करून नव्याने बांधकाम करण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बजेट योजनेंतर्गत गोरेगाव ते ठाणा या 12 किमी रस्त्याच्या बांधकामाला गेल्या काही महिन्यांपासून सुरुवात झाली असून लाखो रुपयांचा निधी या बांधकामावर खर्च करण्यात येत आहे.
तर कंत्राटदारांकडून सद्या रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात येत आहे. मात्र, संबंधित कंत्राटदाराने नियमाची पायमल्ली करून गोरेगाव शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एमसीपी शाळेजवळील परिसरात मार्गावरील छोट्या पुलाच्या पाईपचे काम पूर्ण न करता थेट रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील जुन्या पुलाचे पाईप रुंदीकरणाच्या कामात बंद झाल्याने नाल्याच्या पाण्याचा प्रवाह अवरूद्ध झालेला आहे. परिणामी दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचे पाणी रस्त्याच्या एका बाजूला साचले असून सदर नाला तुडुंब भरलेला आहे. अशावेळी या पुलाचे बांधकाम करून पाण्याचा प्रवाह सुरु न केल्यास येत्या पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचून सदर पाणी या परिसरातील 20 ते 25 एकर शेत जमिनीत शिरण्याची भिती येथील शेतकर्यांकडून व्यक्त केली जात आहे.
तर पाण्याचा प्रवाह अवरूद्ध झाल्याने दुसर्या टोकावरील शकडो एकर शेती कोरडी राहून पाण्याअभावी शेती कशी करावी अशी चिंता रस्त्याच्या दुसर्या भागातील शेतकर्यांकडून व्यक्त होत आहे. तर या प्रकाराची जाणीव संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना असतानाही त्यांच्याकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्याचा हा विकास येथील शेतकर्यांसाठी तरी भकास ठरू पाहत आहे.
◼️रस्त्याच्या कडेवर भगदाड अधिकारी अनभिज्ञ
संबंधित कंत्राटदारांकडून रस्ता रुंदीकरणाच्या कामात जुन्या पुलाला ( सीडी वर्क) जोडून रुंदीकरण करत असलेल्या ठिकाणी पाईप बसवून नव्याने पुलाचे बांधकाम करणे गरजेचे होते. मात्र, पैसे वाचविण्याच्या नादात कंत्राटदारांकडून पुलाची निर्मिती न करता मुरुम व माती टाकून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या पहिल्याच पावसाने या ठिकाणावरील माती वाहून गेली असल्याने रस्त्याच्या कडेवर भलेमोठे भगदाड पडले आहे. मात्र, याची कसलीच माहिती नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
◼️सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना नाही…
सद्या सुमारे तीन ते चार किमीच्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूला खोदकाम करून गिट्टी टाकण्यात आलेली आहे. मात्र, कंत्राटदारांकडून सुरक्षेच्या दृष्टीने कसल्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे या मार्गावर दरदिवशी छोटे-मोठे अपघात घडत असतात. त्यात जुन्या पुलाच्या ठिकाणी रस्त्याच्या कडेवर मोठे खड्डे पडले असले तरी या ठिकाणीही कसल्याच प्रकारचे फलक लावण्यात आलेले नाही. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता बळावली आहे.
क़ाय म्हणाले अभियंता – रस्त्याचे काम बजेट अंतर्गत करण्यात येत आहे. मात्र, कामाचे नाव व किती निधीतून करण्यात येत आहे, याची माहिती नाही. तर रुंदीकरणाच्या कामात छोटा पुल (सीडी वर्क) चे काम करायचे असून कंत्राटदाराने पुलाचे बांधकाम करणे गरजे होते. या बाबत कंत्राटदाराशी बोलून पुलाचे बांधकाम करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत.
– रविंद्र गायकवाड, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, गोरेगाव
०००००००००००००