मतदानासाठी कोविड नियमांचे पालन आवश्यक
-जिल्ह्यात 16 हजार 480 शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क
-जिल्ह्यात 43 मतदान केंद्र
नागपूर – महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी नागपूर जिल्ह्यातील एकूण पात्र शिक्षक मतदारांची संख्या 16 हजार 480 इतकी आहे. जिल्ह्यात एकुण 43 मतदान केंद्र आहेत. या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निर्देशाप्रमाणे कोविड- 19 मध्ये दिलेल्या सुचनांचे पालन करावयाचे आहे. मतदानाचे दिवशी शिक्षक मतदारांनी मास्क घालून येणे आवश्यक आहे.
रांगेत उभे असतांना 6 फुटाचे अंतर राखणे आवश्यक आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सॅनिटायझरची सोय केलेली असून त्याचा वापर करण्यात यावा. ताप असल्यास, जाणवत असल्यास, कोविड-19 पॉझिटिव्ह असल्यास अशा मतदारांनी मतदानाकरीता शेवटच्या तासाला म्हणजे 3 ते 4 या वेळेतच मतदान करावे, अशा सूचना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या आहेत.
निवडणूक आयोगाने 29 डिसेंबरच्या पत्रकान्वये महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. या निवडणुकीसाठी मतदान ३० जानेवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत तर मतमोजणी 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे.