भारतातील हेलीकॉप्टर्सच्या देखभालीसाठी एअरबस हेलीकॉप्टर्स आणि इंडामेर ह्यांच्यात करार
Airbus,Indamer ,Helicopter ,MRO, AirbusHelicopters ,AatmaNirbharBharat
नागपूर, ८ डिसेंबर २०२३: एअरबस हेलीकॉप्टर्स आणि इंडामेर ह्यांनी, भारतातील हेलीकॉप्टर्सना अत्याधुनिक सुटे भाग व अॅक्सेसरींची (आफ्टर-मार्केट) सेवा देण्याच्या उद्दिष्टाने, सहयोग करार केला आहे. ह्यामुळे देशातील रोटरी-विंग्जच्या देखभाल, दुरुस्ती व तपासणी (मेण्टेनन्स, रिपेअर अँड ओव्हरहॉल अर्थात एमआरओ) परिसंस्थेला लक्षणीय चालना मिळणार आहे.
इंडामेर, एअरबस हेलीकॉप्टरने दिलेल्या अधिकारांखाली, मुंबई, नवी दिल्ली व नागपूर आस्थापनांमधील एअरबस हेलीकॉप्टर्सना एमआरओ सेवा पुरवणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या हस्ते आज नागपूर आस्थापनेचे उद्घाटन करण्यात आले. एअरबस हेलीकॉप्टर्सच्या ग्राहक सहाय्य व सेवा विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष रोमेन ट्रॅप आणि इंडामेर एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रजय पटेल ह्यावेळी उपस्थित होते. तसेच एअरबस भारत व दक्षिण आशियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रेमी मेलार्ड आणि एअरबस भारत व दक्षिण आशियाच्या हेलीकॉप्टर विभागाचे प्रमुख सनी गुगलानी हेही सोहळ्याला उपस्थित होते.
“भारतात एक शाश्वत एण्ड-टू-एण्ड रोटरी विंग विमानसेवा परिसंस्था उभी करणे आणि तिला आधार देणे एअरबस हेलीकॉप्टर्ससाठी महत्त्वाचे आहे. भारतातील आमच्या वाढत्या ताफ्याच्या आवश्यकता तसेच भविष्यातील संभाव्यता, इंडामेरच्या मदतीने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट, आमच्यापुढे आहे. त्याचवेळी भारताच्या एमआरओबाबतच्या महत्त्वाकांक्षा आणखी पुढे घेऊन जाण्यात मदत करणारी तांत्रिक कौशल्ये विकसित करण्याचे लक्ष्यही आम्ही ठेवले आहे,” असे एअरबस हेलीकॉप्टर्सच्या ग्राहक सहाय्य व सेवा विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष रोमेन ट्रॅप म्हणाले.
“दहा वर्षांपूर्वी इंडामेरने रोटरी-विंग एमआरओ विभाग स्थापन करून, भारतातील हेलीकॉप्टर ग्राहकांच्या वाढत्या मागण्यांच्या पूर्ततेवर लक्ष केंद्रित करण्याचा धोरणी निर्णय घेतला. एअरबसकडून मिळालेली मान्यता हे कंपनीने ह्यावर लक्ष केंद्रित केल्याचे थेट फलीत आहे. योग्य सहाय्य मिळाल्यास, भारतीय ग्राहकांच्या देखभालविषयक आवश्यकता देशांतर्गत पातळीवरच प्रभावीरित्या पूर्ण केल्या जाऊ शकतात, ह्यावरील आमचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. हे सामूहिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही एअरबससोबत काम करत आहोत आणि त्यांनी दिलेल्या मान्यतेबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो,” असे इंडामेर एव्हिएशनचे संचालक प्रजय पटेल म्हणाले.
इंडामेर-एअरबस हेलीकॉप्टर्स एमआरओ जलद गतीने सर्व्हिसिंगच्या सेवा देईल. त्याचप्रमाणे एअरबस हेलीकॉप्टर्सच्या केवळ भारतातीलच नव्हे, तर व्यापक दक्षिण आशिया भागातील ग्राहकांना एक कार्यक्षम आफ्टर-मार्केट (सुटे भाग आणि अॅक्सेसरी पुरवणे) अनुभव देईल.
एअरबस हेलीकॉप्टर्सचा इंडामेरसोबत झालेला सहयोग हे एअरबसच्या भारतात कार्यक्षेत्र विस्तारण्याच्या प्रयत्नांतील नवीन पाऊल आहे. देशात एक प्रगल्भ, सर्वसमावेशक एअरोस्पेस परिसंस्था उभी करण्याच्या दृष्टीने पाया घालण्याची कंपनीची इच्छा आहे. आज एअरबसच्या प्रत्येक व्यावसायिक विमानामध्ये (एअरक्राफ्ट) व हेलीकॉप्टरमध्ये उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे आणि त्यांच्या सुट्या भागांचे डिझाइन, उत्पादन व देखभाल भारतातच केली जाते.
इंडामेर आधीपासूनच भारतातील हेलीकॉप्टर्ससाठी सर्वांत मोठी एमआरओ ऑपरेटर कंपनी आहे. नागपूर, मुंबई, पुणे आणि नवी दिल्ली अशा अनेक ठिकाणी कंपनीचे कार्यक्षेत्र विस्तारलेले आहे. देशांतर्गत नागरी व पॅरापब्लिक (सार्वजनिक व खासगी क्षेत्र दोहोंचा सहभाग असलेले) हेलीकॉप्टर बाजारपेठेत एअरबस ही आघाडीची कंपनी आहे. २०१० सालापासून झालेल्या नवीन नोंदणीकृत डिलिव्हरींपैकी अर्ध्याहून अधिक एअरबसने केल्या आहेत. सध्या एअरबसकडे १२५हून अधिक हेलीकॉप्टर्स आहेत. ह्यात एच१२५, एच१३०, एच१३५, एच१४५ आणि डौफिन ह्यांसारख्या जागतिक स्तरावरील आघाडीच्या प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे. कंपनीद्वारे ह्यांचा वापर भारतभरात तसेच दक्षिण आशिया भागात केला जातो. विमानसेवेच्या ऊर्जा, व्यवसाय व व्यापार ह्या विभागांमध्ये ह्यांचा वापर विशेषत्वाने केला जातो.