भंडारा-गोंदियात रस्सीखेच कायमम…!मतदारांमध्ये संभ्रमावस्था
गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून अद्यापही महाविकास आघाडी आणि महायुतीचे कोडे सुटलेले नाहीत. आघाडीकडून नाना पटोले यांचे नाव निश्चित झाल्याच्या चर्चा होत असताना शरद पवार गटाकडूनही या जागेसाठी दावा करण्यात येत आहे. दुसरीकडे भाजपच्या गोटात उमेदवारी मिळावी याकरिता पक्षांतर्गत शक्तिप्रदर्शन सुरू आहे. परिणामी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ येऊन ठेपली असताना एकाही पक्षाकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे लोकसभा क्षेत्रातील मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
16 मार्च रोजीपासून लोकसभा 2024 च्या निवडणूकीची आचारसंहिता लागू झाली आहे. तर काल, (ता.20) नामनिर्देशन पत्र दाखल करण्याला सुरुवात झाली आहे. मात्र, भंडारा-गोंदिया लोकसभेत युती व आघाडीतून उमेदवारांच्या नावाची घोषणा झालेली नाही. विशेषतः भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात कोणत्याच पक्षाने आपले पत्ते उघड केलेले नाहीत. एकीकडे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपला मोर्चा गडचिरोली-चिमूर मतदारसंघाकडे वळविला असला तरी भाजपच्या गोटात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरूच आहे. गेल्या निवडणुकीत सुनील मेंढे प्रचंड मतांनी विजयी झाले होते. त्यामुळे तिकिट मिळविण्यासाठी त्यांच्याकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. तर माजी मंत्री डॉ.परिणय फुके हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असून यांनीही आपली फिल्डिंग लावून ठेवली आहे. तेव्हा उमेदवारीची माळ डॉ. फुके यांच्या गळ्यात पडणार असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून बोलले जात आहे. त्यामुळेच भाजपने अद्याप उमेदवाराचे नाव पुढे केले नाही.
तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लोकसभेत लढण्यास ईच्छूक नसताना त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चा दोन्ही जिल्ह्यात होऊ लागल्या आहेत. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडूनही या जागेवरून लढण्याची तयारी दर्शविण्यात आली असून माजी खासदार मधुकर कुकडे यांचे नाव पुढे येत आहे. या बदलत्या राजकीय समीकरणांमुळे लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांबाबत महाविकास आघाडी आणि महायुतीसमोर आव्हान निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतरही व उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झाली असली तरी अद्याप उमेदवारीसाठी कोणत्याही पक्षाकडून स्पष्ट नाव पुढे आलेले नाही. मात्र, या सर्व प्रकारात दोन्ही जिल्ह्यातील मतदारांमध्येही संभ्रमावस्था असून उमेदवारी कुणाला मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.