पोलिस अधिकारी संजय देशमुख..वाढदिवस निमित्य ..!
पोलीस विभागातील एक दबंग पोलीस अधिकारी म्हणून ज्यांची ख्याती आहे असे पोलीस अधिकारी म्हणजे संजय देशमुख साहेब. अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय अशी त्यांची ओळख. चांगली सहा फूट उंची, मजबूत देहयष्टी आणि पहाडी आवाज असे प्रभावी व्यक्तिमत्त्व.
‘ कारे, जास्त मस्ती आली का? ‘
असे गुन्हेगाराला म्हणताच गुन्हेगाराची घाबरगुंडी उडायची. एरवी गुन्हेगारांशी कडक वागणारे देशमुख साहेब सर्वसामान्य जनतेशी मात्र सौजन्याने व आदराने वागणार. असे वाटणार ही नाही की हा व्यक्ती इतका कडक असेल. अत्यंत मृदू व सौम्य भाषा. आपल्यामुळे कोणावर अन्याय व्हायला नको याची सतत काळजी घेणार.
तीस वर्ष पोलीस विभागात कोणताही डाग न लागता सेवा करणे सोपे काम नाही. त्यासाठी फार मोठा त्याग करावा लागतो. समर्पित भावनेने काम करावे लागते. आलेल्या अनेक मोहाच्या प्रसंगाना टाळावे लागते. यात देशमुख साहेब यशस्वी झाले असेच म्हणावे लागेल. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांना पोलीस विभागातील सर्वोच्च अश्या राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
वरीष्ट पोलीस निरीक्षक या पदावरून दोन वर्षापूर्वी सन्मानाने सेवानिवृत्त झाले पण प्रकृती अजूनही उत्तम आहे. आता सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांनाही लाजवेल अशी प्रकृती देशमुख साहेबांनी राखली आहे. नियमित व्यायाम व व्यसनापासून दूर हेच त्यांच्या उत्तम प्रकृतीचे गमक असावे.
‘ काहीही झाले तरी मी सकाळचा व्यायाम चुकवत नाही आणि कोणत्याही गोष्टीचे टेन्शन अजिबात घेत नाही ‘
हे त्यांचे म्हणणे असायचे आणि हे खरोखरच कौतुकास्पद व अनुकरणीय असेच आहे.
अमरावती येथे आले की नक्की भेटा असे त्यांचे आग्रहाचे बोलावणे असते.
पुसद व अमरावती येथे आम्ही सोबत नौकरी केली होती .
‘ पांडे साहेब,तुम्ही काही काळजी करू नका. मी पाहून घेतो ‘
अशी सहकार्याची व मदतीची त्यांची नेहमी साद असायची.जे काय आहे ते स्पष्ट बोलणार. ना काही आडपडदा ना काही मनात कपट. एकदम सरळ माणूस. आपण बरे आणि आपले काम बरे. ना पदाचा गर्व ना कामाचा अभिमान. एकदम साधे राहाणीमान.
मदतीला नेहमी आपला हात पुढे करणार. म्हणूनच तर त्यांना आम्ही सर्व आदराने
‘ बापूसाहेब ‘ या नावाने संबोधतो.
तर अश्या यारो के यार,दिलदार अश्या संजय देशमुख साहेब यांचा आज जन्मदिवस आहे.
त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व उदंड, निरामय आयुष्य लाभून मनोवांछित इच्छा सफल होवोत हीच विधात्याचरणी प्रार्थना.
संजय भिकाजी पांडे
पोलीस उपअधीक्षक ( नि.)
नागपूर