पदवीधर शिक्षकाचा मद्यधुंद अवस्थेत शाळेतच धिंगाणा
◼️आमगाव तालुक्यातील पदमपुर शाळेतील प्रकार
◼️मद्यपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
गोंदिया : आमगाव तालुक्यातील पदमपुर येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत एका मद्यपी शिक्षकाने मद्यप्राशन करून चांगलाच धिंगाणा घातल्याचा प्रकार 7 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आला. विशेष म्हणजे, हा या शिक्षकाचा गोंधळ शाळेतील विद्यार्थी व उपस्थित शिक्षकांनीही चांगलाच अनुभवला. काशीराम दूलीराम चौरागडे (वय 51) असे त्या दारुड्या पदवीधर शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी आमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पदमपुर येथे जुलै-2024 पासून उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. 7 डिसेंबर रोजी फिर्यादी महिला व इतर शिक्षक विद्यार्थी शाळेत पोहोचले. त्यातच पदवीधर शिक्षक काशीराम चौरागडे हा देखील नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत शाळेत पोहोचला. दरम्यान, दारुड्या शिक्षक काशीराम चौरागडे यांनी भर शाळेत चांगलाच धिंगाणा घातला. यावेळी उपस्थित शिक्षकाने चौरागडे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, दारूच्या नशेत भान विसरलेल्या शिक्षकाला शाळा आणि आपले गोंधळ कळू शकले नाही. यामुळे शाळेत काही काळ चांगलाच गोंधळ उडाला होता. फिर्यादी मुख्याध्यापिकेच्या तक्रारीवरून आमगाव पोलीस ठाण्यात दारोड्या शिक्षकाविरुद्ध कलम 85(1) मदका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार उईके करीत आहेत.
०००००००००